महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत X अकाऊंट आज (दि. २१) सकाळी हॅक झाल्याची घटना घडली. हॅकर्सनी अकाऊंटवर पाकिस्तान व तुर्कियेचे झेंडे असलेली पोस्ट शेअर केली. त्याचबरोबर एक व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रीमिंगही करण्यात आले. राज्यातील प्रमुख नेत्याच्या अकाऊंटवर अशी संशयास्पद हालचाल होताच काही मिनिटांत पोस्ट डिलीट करण्यात आली आणि अकाऊंट पुन्हा सुरक्षित करण्यात आले.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि सायबर सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या काही तासांपूर्वीच ही घटना घडल्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे. पोस्टमध्ये वापरलेले झेंडे आणि व्हिडीओची पार्श्वभूमी लक्षात घेता, हा सायबर हल्ला असल्याचे मानले जात आहे.
सायबर सेलने तत्काळ तपास सुरू केला असून हॅकिंगदरम्यान वापरलेले आयपी ॲड्रेस शोधण्याचे काम सुरू आहे. अकाऊंट हॅक करण्यामागचा हेतू, यामागे कोणत्या संघटना किंवा हॅकर ग्रुपचा हात आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. त्या वेळी तुर्कियेने पाकिस्तानला उघडपणे साथ दिली होती आणि ड्रोन पुरवठा केल्याचा आरोपही झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या अकाऊंटवर तुर्किये व पाकिस्तानाशी संबंधित चिन्हे पोस्ट होणे ही बाब गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारनेही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला असून, सायबर विभागाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.