निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’, त्याचे फायदे व प्रभाव काळाच्या हाती; रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची भूमिका

निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’, त्याचे फायदे व प्रभाव काळाच्या हाती; रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची भूमिका

रविवारी दत्तात्रेय होसबाळे यांची तीन वर्षांसाठी 'सरकार्यवाह' म्हणून पुन्हा निवड करण्यात आली.

नागपूर : निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’ आहे आणि तो किती फायदेशीर आणि प्रभावी असेल हे काळच ठरवील, असे मत व्यक्त करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी रविवारी या रोख्यांचे (इलेक्ट्रोरल बॉण्ड) समर्थन केले.

रविवारी दत्तात्रेय होसबाळे यांची तीन वर्षांसाठी 'सरकार्यवाह' म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. शुक्रवारी नागपुरात सुरू झालेल्या रा. स्व. संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

पोलाद क्षेत्रातील लक्ष्मी मित्तल ते सुनील मित्तल यांची एअरटेल, अनिल अग्रवाल यांची वेदांत, आयटीसी, महिंद्रा आणि महिंद्रा आणि कमी प्रसिद्ध फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस हे राजकीय देणग्या देण्यासाठी असलेल्या या रोख्यांचे खरेदीदार होते. आता रद्द करण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या संबंधातील दाव्यांबद्दल होसबाळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, संघाने अद्याप याबद्दल चर्चा केलेली नाही. कारण निवडणूक रोखे हा एक ‘प्रयोग’ आहे. हे त्रुटी असेल तर दुरुस्त करता येईल, अशा टप्प्यातील आहे. तसेच हे रोखे काही आज अकस्मातपणे आणले गेले नाही, तर ती योजना याआधीही आणली गेली होती.

जेव्हा जेव्हा बदल केला जातो तेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात. जेव्हा ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. नवीन गोष्टी समोर आल्यावर लोकांकडून प्रश्न उपस्थित होणे सहाजिक आहे. पण ही नवी व्यवस्था कितपत फायदेशीर आणि परिणामकारक आहे हे येणारा काळच सांगेल. त्यामुळे ती प्रयोगासाठी सोडावी, असे संघाचे मत आहे, असे होसबाळे म्हणाले.

नरेंद्र मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या शासनाविषयी विचारले असता ते म्हणाले की, संघ समान नागरी संहितेचे स्वागत करतो. त्या संबंधातील ठराव अनेक वर्षांपूर्वी संघटनेच्या 'अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत' मंजूर करण्यात आला होता. आता तो उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आला आहे. आम्हाला ते देशभरात लागू केले जावे असे वाटते. परंतु उत्तराधिकार, दत्तक, विवाह आणि इतर मुद्द्यांवर काही तपशील आहेत ज्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर ते पुढे जाऊ शकतात, असेही होसबाळे म्हणाले.

गेल्या दहा वर्षांत देशाने केलेली प्रगती लोकांनी पाहिली आहे आणि नामवंत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि राजकीय विचारवंतांनीही चालू शतक हे भारताचे शतक असल्याचा पुनरुच्चार केला आहे, असे ते म्हणाले. हे सांगण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं घडत असेल. काहीही झालं तरी लोक ४ जूनला लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी आपला निकाल देतील, असं ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in