रोजगार कि मृत्यूचा सापळा? चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात तीन दिवसांत पाच महिलांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागांमध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाच्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गेल्या तीन दिवसांत पाच महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
रोजगार कि मृत्यूचा सापळा? चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात तीन दिवसांत पाच महिलांचा मृत्यू
Published on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागांमध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाच्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गेल्या तीन दिवसांत पाच महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

तीन महिलांचा एकाच दिवशी मृत्यू

१० मे रोजी मेंढा-माळ गावात वाघाच्या हल्ल्यात कांता बुधाजी चौधरी (वय ६५), शुभांगी मनोज चौधरी (वय २८) आणि रेखा शालिक शेंडे (वय ५०) यांचा मृत्यू झाला. शुभांगी आणि कांता या सासू-सून असून त्यांच्या मृत्युमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घरात आता केवळ मनोज चौधरी, त्याचा १० वर्षांचा मुलगा सोहम आणि ८ वर्षांची मुलगी आराध्या हे तिघेच उरले आहेत. मनोज यांचे वडील या पूर्वीच निधन पावले असून आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. ते मजुरी करून उपजीविका चालवतात.

आणखी दोन घटनांमध्ये दोन महिलांचा बळी

वाघाच्या हल्ल्यात ११ मे रोजी मूल तहसीलमधील महादवाडी गावातील विमला बुधा दोंदे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. तर १२ मे रोजी मूळ तहसीलमधील भादुराणा गावात भूमिका दीपक भेंडारे (वय २८) हिला वाघिणीने ठार केले.

वन विभागाची तात्काळ कारवाई

१२ मे रोजी वन विभागाने टी-८१ वाघिणीला सिंदेवाही वनपरिक्षेत्रात बेशुद्ध करून जेरबंद केले. या वाघिणीचे तीन बछडे अजूनही परिसरात असून, त्यांचा शोध सुरू आहे. त्यावर ३४ ट्रॅप कॅमेरे आणि ८ लाईव्ह कॅमेरे बसवून नियंत्रण ठेवले जात आहे. वन विभागाने मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची ५० हजार रुपयांची मदत दिली आहे.

रोजगार की मृत्यूचा सापळा?

चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात तेंदूपत्ता गोळा करणे ही पारंपरिक उपजीविकेची पद्धत आहे. मात्र, हीच उपजीविका आता जीवनघातक ठरत आहे. गावकरी म्हणतात, “रोजगार हवा, पण त्यासाठी जीव गमवावा लागत आहे, हे दुर्दैव आहे.” या घटनांमुळे संतप्त ग्रामस्थांनी शासनाकडे सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची, नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई देण्याची आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली आहे.

जानेवारी २०२५ पासून १७ जणांचे बळी

वाघाच्या हल्ल्यांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण वाघाच्या हल्ल्यांमुळे जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. वन्यजीव आणि मानव यामधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.

logo
marathi.freepressjournal.in