

जळगाव : यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र ठरला असून जळगाव जिल्ह्याचे तापमान हे ४६ अंशापर्यंत गेल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यांना बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणात केवळ ३४ टक्के तर धुळे जिल्ह्यात ३९ टक्के पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. यंदा पाऊस हा कमी प्रमाणात असल्याच्या बातम्या येत असताना उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२०२५ च्या पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठी धरणे व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरली होती. असे असताना आज तापी नदीवरील हतनूर धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा आहे. हे धरण ५४ टक्के गाळाने भरले असल्याने या धरणातील आज असलेला पाणीसाठा हा फसवा असू शकतो. भुसावळ रेल्वे, शहर, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ आणि वरणगाव यांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
यंदा पाऊस उशिरा आणि कमी प्रमाणात असल्याने चिंतेचे वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरणात केवळ ३० टक्के पाणी आहे. या धरणातून सात तालुके, दोन महापालिका, १० नगरपालिका, १३० पाणीपुरवठा योजना, १७४ गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पुरवणे आव्हान ठरणार आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ६४ टक्के पाणीसाठा असून सध्या शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीचे संकेत महापालिकेकडून दिले गेले आहेत. येत्या पावसाळ्यात पाऊस कमी झााल्यास वाघूर भरणे कठीण जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले तरी आज या प्रकल्पात ४१ टक्के साठा आहे. भोकरबारी व हिवरा प्रकल्पात केवळ १२ टक्के, बोरी प्रकल्प कोरडा पडला आहे. अग्नावती प्रकल्पात २.२० टक्के, तोंडापूर ९ टक्के, बहुळा प्रकल्पात २९ टक्के साठा आहे. सातपुड्यातील सुकीमध्ये ६७ टक्के, टक्के साठा आहे. धुळे जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली तरी आज धुळे जिल्ह्यातील प्रकल्पात ३९ टक्के साठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी तो ४४ टक्के होता. नंदुरबार जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात आज ५४ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच दिवशी तो ५९ टक्के होता.
जिल्ह्यात ४१ टक्के साठा
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले तरी आज या प्रकल्पात ४१ टक्के साठा आहे. भोकरबारी व हिवरा प्रकल्पात केवळ १२ टक्के, बोरी प्रकल्प कोरडा पडला आहे.