

जळगाव : जळगाव जिल्ह्यात ४६ अंशापर्यंत तापमान गेले असून यामुळे जिल्हा होरपळून निघत असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील पाणीसाठ्यावर झालेला आहे. जिल्ह्यातील धरणात ४० टके पाणीसाठा असून १३ मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे सध्याचे तापमान पाहता असलेले पाणी हे जुलै अखेरपर्यंत पुरवणे हे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी ४५ अंशापर्यंत तापमान जाते. यंदा मात्र तापमानाने ही मर्यादा ओलांडली असून ४६ अंश तापमान नोंदवले गेले. या वाढत्या तापमानाने सारेच होरपळले जात असून धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. यंदा पावसाळ्यात जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर हे तीनही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. २३ एप्रिलला या तीनही प्रकल्पांचा साठा हा ५२ टक्के होता. आज हा साठा ४० टक्क्यांवर आला आहे. यात हतनूर २९ टक्के, गिरणा ३१ टक्के तर वाघूर ६९ टक्के पाणीसाठा आहे. हतनूर धरणात आज ५४ टक्के गाळ साठलेला असल्याने या धरणातील पाणीसाठा हा फसवा असल्याचे सांगितले जाते.
भुसावळ शहर, रेल्वे, वरणगाव आणि भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी, जळगाव एमआयडीसी यांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. सध्याचा साठा पाहता जुलै अखेर पाणी पुरवणे हे आव्हान ठरणार असले तरी पाणी काटकसरीने वापरावे लागेल, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणा धरणात आज ३१ टक्के पाणीसाठा आहे. एक महापालिका दहा नगरपालिका, १७४ गावे, १३० पाणीपुरवठा योजना व सात तालुक्यांना या धरणातून पाणी पुरवठा होतो.
बाष्पीभवनाने पाणीसाठा हा कमी होत असून जुलै अखेर पाणी पुरवणे हे आव्हान आहे. वाघूर धरणातून जळगाव शहराला पाणीपुरवठा होत असून याज या धरणात ६९ टक्के पाणी असल्याने जळगावकरांना पाण्याची चिंता आहे. जिल्ह्यात १४ मध्यम प्रकल्प असून बहुतेक प्रकल्प यंदा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले होते.
अखेर जिल्ह्यात ११ टँकर सुरू
आतापर्यंत जिल्ह्यात यंदा एकही टँकर सुरू नव्हता. जिल्ह्यात सात गावांना अकरा अँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ४२ गावांत ४३ विहिरी या अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. अमळनेर, जामनेर आणि भुसावळ तालुक्यात ही पाणीटंचाईची स्थिती उदभवली आहे. पाणीसाठा वाढण्यासाठी धरणातील गाळ काढण्याचे सरकारने जाहीर केले. तरीही धरणातील गाळ कोण काढणार, कसा काढणार कधी काढणार याबाबत कोणतेही मार्गदर्शन आलेले नसल्याने प्रशासनात संभ्रमाचे वातावरण आहे.