Thane : उन्हाच्या चटक्याने जिल्हा होरपळला; पाणीटंचाईने ग्रामीण भागात भीषण परिस्थिती

ठाणे जिल्ह्यात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत असून शहर व ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत.
Thane : उन्हाच्या चटक्याने जिल्हा होरपळला; पाणीटंचाईने ग्रामीण भागात भीषण परिस्थिती
Thane : उन्हाच्या चटक्याने जिल्हा होरपळला; पाणीटंचाईने ग्रामीण भागात भीषण परिस्थिती'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

अतुल जाधव/ठाणे

ठाणे जिल्ह्यात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत असून शहर व ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. तापमानाने कमाल पातळी गाठली असताना ग्रामीण भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना तात्पुरता गारवा अनुभवायला मिळाला. पर्जन्यराजाचे आगमन अद्याप दूर असले तरी अवकाळी सरींनी त्याची चाहूल दिल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या उन्हाळ्यात आतापर्यंतचे तापमानाचे सर्व विक्रम मोडले असून पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकीकडे उष्णतेची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेषतः मुरबाड आणि शहापूर तालुके सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. काही ठिकाणी विहिरींमध्ये साचलेले गढूळ पाणी प्यायल्यामुळे कावीळ, अतिसार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची आवश्यकता असून त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होत आहे.

Thane : उन्हाच्या चटक्याने जिल्हा होरपळला; पाणीटंचाईने ग्रामीण भागात भीषण परिस्थिती
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा...१ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव

टँकरवर अवलंबून पाणीपुरवठा

जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला असला तरी डोंगराळ भागातील नागरिकांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. सुमारे २७ गावे आणि १०३ पाड्यांमध्ये राहणाऱ्या ४२ हजार २७३ कुटुंबांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजच्या जगण्याचा संघर्ष करावा लागत असून पिण्याचे पाणी डोळ्यातील अश्रूंहूनही महाग झाले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुक्या जनावरांसाठीही पाणी व चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम

बारवी धरण आणि टाटा समूहच्या आंध्रा धरणातील पाण्याचे उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून पाणीसाठा कमी होत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांवर होणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने १४ मेनंतर मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचे संकेत दिले असून मे अखेरपर्यंत तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

शहरांवरही परिणामाची शक्यता

ठाणे शहरातील घोडबंदर परिसर, कळवा, मुंब्रा तसेच कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावे, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि बदलापूर-अंबरनाथ भागातही पाणी कपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in