
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. “लोकसंख्या शास्त्रानुसार, लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा कमी व्हायला नको. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने दोनपेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्ये जन्माला घालावीत,” असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
नागपूरच्या कठाळे कुल संमेलनात काही व्यक्तींनी सध्या अनेक तरुण जोडपी एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असे सांगत चिंता व्यक्त केली. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, “सध्या लोकसंख्या कमी होत आहे. लोकसंख्या घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की, जेव्हा जन्मदर २.१ च्या खाली येतो तेव्हा पृथ्वीवरून मानव नष्ट होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. ही परिस्थिती उद्भवल्यास अनेक भाषा, संस्कृती संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होतो. देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ मध्ये ठरविण्यात आले. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ पेक्षा कमी नसावा. आमच्यासाठी दोन-तीन मुले असणे गरजेचे आहे. कारण समाजाचे अस्तित्व राखण्यासाठी हे गरजेचे आहे.”
“आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष २००० च्या जवळपास ठरली. त्यातही असे सांगितले आहे की, लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा खाली राहू नये. पॉइंट एक तर माणूस जन्मतच नाही. मग जर २.१ एवढा लोकसंख्यावाढीचा दर पाहिजे असेल, तर अपत्ये कमीत कमी ३ असावीत. तसेच हिंदूंच्या संख्येत ७.८ टक्क्यांनी घट झाली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने १९५० ते २०१५ या काळात भारतात हिंदू बहुसंख्य होते असे स्पष्ट केले आहे, तर दुसरीकडे आता हिंदूंच्या लोकसंख्येत ७.८ टक्क्यांनी घट झाल्याचेही आढळून आले आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये त्या देशातील प्रमुख धर्मीयांची लोकसंख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे,” असे मोहन भागवत म्हणाले.
मुस्लिम धर्मीयांच्या संख्येत वाढ
१९५० ते २०१५ या काळात मुस्लिमांच्या लोकसंख्येत ४३.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ख्रिश्चन समाजाच्या लोकसंख्येत ५.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच शीख धर्मीयांच्या लोकसंख्येतही ६.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात बौद्ध धर्मीयांच्या संख्येत वाढ झाली आहे. १९५० साली भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येचा वाटा ८४ टक्के होता, तो आता २०१५ साली ७८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर मुस्लिमांचा १९५० मध्ये असलेला वाटा ९.८४ टक्के होता, तो आता १४.०९ टक्क्यांवर आला असल्याची माहिती मोहन भागवत यांनी दिली.