छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या घरांसाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत सादर करता येणार अर्ज

मुदतवाढ देण्यात आली असल्याने अधिकाधिक अर्जदारांनी सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या घरांसाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत सादर करता येणार अर्ज

मुंबई : म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारितील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत १ हजार ४९५ सदनिका व भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी मंडळाने ऑनलाईन अर्ज मागवले होते. अर्जदारांच्या विनंतीनुसार मंडळाने अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्यास २६ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे २८ फेब्रुवारी रोजी ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली होती. या कालावधीत अतिरिक्त १९३ सदनिका व गाळे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले. तसेच अर्जदारांना अर्ज सादर करून सोडतीत सहभाग घेण्याकरिता २० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती.

सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या समस्यांमुळे मंडळाने अर्जदारांच्या आग्रहास्तव अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीस २६ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रकानुसार अर्जदार २६ मे रात्री ११.५९ पर्यंत अर्ज दाखल करून मंडळाच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतील. तसेच अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन पेमेंटद्वारे २६ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत करू शकतील. बँकेत आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा २७ मेपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये करू शकतील, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी दिली.

तसेच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोडतीबाबतची संपूर्ण माहिती व अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुदतवाढ देण्यात आली असल्याने अधिकाधिक अर्जदारांनी सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन देखील वैद्य यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in