
मुंबई : शिवसेनेच्या ५९व्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक शैलीत भाजपचा खरपूस समाचार घेतला. ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न कराल तर भाजपचे नामोनिशाण मिटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बोलबच्चन भैरवींना उत्तर देत नाही, या अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
शिवसेना संपली नाही, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी तर ‘सेना’ गमावली, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभ सोडून उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या चरणी नतमस्तक झाले, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात - बावनकुळे
ठाकरे गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीने ओकलेली हतबलता होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच त्यांनी केल्याचे म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. बावनकुळे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.