Pune : 'उपाय सांगतो' म्हणत तरुणीचा विनयभंग; भोंदू ज्योतिषाला अटक

पुण्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, सहकारनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाच्या जन्मपत्रिकेवर उपाय सांगण्याच्या बहाण्याने एका २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे.
Pune : 'उपाय सांगतो' म्हणत तरुणीचा विनयभंग; भोंदू ज्योतिषाला अटक
Published on

पुण्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, सहकारनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाच्या जन्मपत्रिकेवर उपाय सांगण्याच्या बहाण्याने एका २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ज्योतिष अखिलेश लक्ष्मण राजगुरू (वय ४५) याला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

१२ जुलै रोजी लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी तरुणी आपल्या मोठ्या भावाची जन्मपत्रिका घेऊन आरोपी राजगुरूच्या कार्यालयात गेली होती. राजगुरूने पत्रिका पाहून भावाच्या अडचणी दूर करण्यासाठी एका खास वनस्पतीची आवश्यकता असल्याचं सांगितलं आणि ती शनिवारपर्यंत मिळेल असं सांगून तिला पुन्हा बोलावलं. पुढे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सतत संपर्क साधून १९ जुलै रोजी सकाळी एकटीला येण्याचा आग्रह केला.

निर्धारित दिवशी तरुणी कार्यालयात गेली असता, तेथे इतर कोणीच नव्हतं. "डोक्यावर वस्तू ठेवून मंत्र बोलावे लागतील" असं सांगून आरोपीने तिला पडद्यामागे नेण्याचा प्रयत्न केला. संशयास्पद हालचाली लक्षात येताच तरुणी सावध झाली आणि तिने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच आरोपीने तिला मिठी मारून किस करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने त्याला ढकलून तिथून पळ काढला.

पोलिसांत तक्रार आणि अटकेची कारवाई -

या प्रकारानंतर तरुणीने आपल्या भावाला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. सहकारनगर पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकून त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा तसेच विनयभंगाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी आल्या असण्याची शक्यता आहे.

पुण्यात अंधश्रद्धेच्या घटनेत वाढ -

हा प्रकार घडण्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क भागात एका भोंदूबाबाने “सोन्याचा हंडा मिळवून देतो” असे सांगत एका महिलेची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्या प्रकरणातही पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in