अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश; नाना पटोल, संजय राऊत यांनी ट्विट करत दिली माहिती

महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मुंबईतील नरीमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडी...
अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश; नाना पटोल, संजय राऊत यांनी ट्विट करत दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत चर्चा सुरु होती. शिवसेना ठाकरे गटही त्यासाठी आग्रही होता. आज(30 जानेवारी) झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत अधिकृतपणे समावेश झाला आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने एकमताने याबाबतचा निर्णय घेतला.

महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मुंबईतील नरीमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीलाही या बैठकीचे निमंत्रण होते. या बैठकीला वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर हे उपस्थित होते. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचे अधिकृत पत्र देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानापटोले आणि ऱाष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह्या असलेले पत्र देत अधिकृतपणे वंचित आघाडी महाविकास आघाडीत सामील झाल्याचे जाहीर केले आहे.

पत्रात काय म्हटलंय?

"देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे", अशी भूमिका असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

"३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे", असे जाहीर करण्यात आले आहे.

नाना पटोले आणि संजय राऊत यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर हे पत्र शेअर करत याबाबतची माहिती दिली. "वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल", असे संजय राऊत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in