"माझ्या उमेदवारीची मागणी..." राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळं छगन भुजबळ नाराज आहेत का? असं पत्रकारांनी विचारलं असता, सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "नाराजी कुठे दिसली..."
"माझ्या उमेदवारीची मागणी..." राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
Published on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या उमेदवारीची मागणी जनतेतून आली होती, पक्षातील सर्वांनी मिळून आपल्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला असून त्यावर कुणीही नाराज नाही, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. त्याचबरोबर दिलेल्या संधीचं सोनं करेन, असंही त्या म्हणाल्या.

भुजबळ साहेबही फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत होते....

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळं छगन भुजबळ नाराज आहेत का? असं पत्रकारांनी विचारलं असता, सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "नाराजी कुठे दिसली नाही. कारण सगळ्यांनी मीटिंग घेऊनच हा निर्णय घेतला आहे. आदरणीय भुजबळ साहेबही फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत होते. त्यांनीही मला शुभेच्छा दिल्या."

माझ्या उमेदवारीची मागणी जनतेतून, पार्थ पवारही होते आग्रही...

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "जनतेकडूनच ही मागणी सतत होत होती. असा आग्रह होऊ नये, म्हणून मी कार्यकर्त्यांना विनंती केली होती. लोकसभा उमेदवारीची मागणी होती. या उमेदवारीसाठीही जनतेतून मागणी करण्यात आली होती. पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलं होतं की, सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असायला पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला होता. कार्यकर्त्यांसोबत त्यांचाही आग्रह होता की, मी राज्यसभेची उमेदवारी घ्यावी. त्यामुळं पक्षातील सर्वांच्या संमतीनं आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे."

प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही...

छगन भुजबळ म्हणाले की, "मीसुद्धा राज्यसभा लढण्यासाठी इच्छुक होतो. पण सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. पक्षात चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला. माझ्या तोंडावर दिसतंय का नाराज आहे? मी नाराज नाही, पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात."

"प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. माझ्यासोबत आनंद परांजपे इच्छुक होते. १३ लोक इच्छुक होते म्हणताय मग सगळ्यांना उमेदवारी देणं शक्य आहे का? एकालाच उभा करायचंय, तर सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झालं," असंही भुजबळांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in