गुलाबी लाटेने जलाशयाला चढली विलक्षण झळाळी! नांदुर मध्यमेश्वर अभयारण्यात दिमाखदार 'रोहित' पाहुण्यांचे आगमन

निसर्गाच्या किमयेचा एक अद्भूत अविष्कार सध्या नाशिक जिल्ह्याचे भूषण आणि महाराष्ट्राची शान असलेल्या नांदुर मध्यमेश्वर अभयारण्यात पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात, जेव्हा सर्वत्र शुष्कता जाणवू लागते, अशा वेळी २८ एप्रिल रोजी या 'महाराष्ट्राच्या भरतपूर'मध्ये हजारो मैलांचा प्रवास करून 'रोहित' (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या थव्यांचे यंदा महिनाभराआधीच आगमन झाले आहे.
गुलाबी लाटेने जलाशयाला चढली विलक्षण झळाळी! नांदुर मध्यमेश्वर अभयारण्यात दिमाखदार 'रोहित' पाहुण्यांचे आगमन
गुलाबी लाटेने जलाशयाला चढली विलक्षण झळाळी! नांदुर मध्यमेश्वर अभयारण्यात दिमाखदार 'रोहित' पाहुण्यांचे आगमनछायाचित्र : नाशिक वन विभाग
Published on

हारून शेख / लासलगाव

निसर्गाच्या किमयेचा एक अद्भूत अविष्कार सध्या नाशिक जिल्ह्याचे भूषण आणि महाराष्ट्राची शान असलेल्या नांदुर मध्यमेश्वर अभयारण्यात पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात, जेव्हा सर्वत्र शुष्कता जाणवू लागते, अशा वेळी २८ एप्रिल रोजी या 'महाराष्ट्राच्या भरतपूर'मध्ये हजारो मैलांचा प्रवास करून 'रोहित' (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या थव्यांचे यंदा महिनाभराआधीच आगमन झाले आहे. त्यांच्या आगमनाने गोदावरी-कादवा नद्यांच्या या संगमावर जणू काही गुलाबी रंगाची उत्सवी लाटच उसळली आहे. निसर्गाचा अनुपम सोहळा आणि सर्वत्र गुलाबी रंगाची पखरण दिसतेय.

नेहमी हिवाळ्यात दिसणारे हे पाहुणे यंदा एप्रिलच्या उत्तरार्धात अवतरल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे भरते आले आहे. २८ एप्रिलच्या त्या दुपारी जेव्हा या पक्ष्यांच्या थव्याने जलाशयावर उतरण्यास सुरुवात केली, तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. निळ्याशार संथ पाण्यावर या पक्षांच्या लांबसडक मानेचे आणि गुलाबी पंखांचे प्रतिबिंब पडल्यामुळे संपूर्ण जलाशय एखाद्या जिवंत कॅनव्हाससारखा भासू लागला.

परतीच्या प्रवासात मुक्काम !

ठाणे, मुंबई, उजनी, जायकवाडी, परिसरातून प्रजनन स्थळ गुजरातच्या लिटिल रण ऑफ कच्छच्या दिशेने परतीचा प्रवास करताना फ्लेमिंगो पक्ष्यांचा मोठा थवा नांदूर मधमेश्वर अभयारण्यात मुक्कामी थांबला आहे पक्ष्यांच्या मध्य आशियाई उड्डाण मार्गांमधील नांदूर मधमेश्वर हे विश्रांती स्थळ मानले जाते.

लोभनीय दृश्याचे साक्षीदार व्हा !

'पक्षी निरीक्षकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे. हया वर्षी अभयारण्यात करण्यात आलेल्या उत्तम अधिवास व्यवस्थापन कामाचे हे फलित आहे'.

कृष्णा भवर, उपवनसंरक्षक, वन्यजीव नाशिक

उन्हाच्या झळा असूनही, पक्ष्यांच्या या थव्याने अभयारण्यातील शांतता आणि सौंदर्य द्विगुणित केले आहे. पानवेलींचे उच्चाटन करून डबकी तयार करण्यात आल्यामुळे ह्यावर्षी मोठ्या प्रमाणावर पक्षी दिसत आहेत ही अभयारण्याच्या जैवविविधतेसाठी व पक्षी प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.

हेमंत उबाळे, सहाय्यक वन संरक्षक, नांदूर मध्यमेश्वर

मुबलक 'शेवाळ' त्यांना भुरळ घालत आहे

कच्छच्या रणातून किंवा सुदूर परदेशातून आलेल्या या पक्ष्यांना नांदुर मध्यमेश्वरमधील उथळ पाणी आणि मुबलक 'शेवाळ' भुरळ घालत आहे. विशेष म्हणजे, या उन्हाळ्यातही जलाशयाची पाणीपातळी आणि तेथील खाद्य या पक्ष्यांसाठी पोषक ठरले आहे. या पाहुण्यांचा थवा जेव्हा एका लयीत आकाशात झेप घेतो, तेव्हा त्यांच्या पंखांखालील गडद गुलाबी आणि काळा रंग आकाशात रंगांची उधळण करतो.

logo
marathi.freepressjournal.in