लोकसभेच्या जागावाटपासाठी आघाडीची समिती

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले आहेत
लोकसभेच्या जागावाटपासाठी आघाडीची समिती

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात इंडिया आघाडीचा सामना रंगणार आहे. इंडिया आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठित केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले आहेत. या समितीच्या आढाव्यानंतर इंडिया आघाडीच्या जागावाटपाच्या प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात होईल.

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांच्या वाटपासंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीन पक्षांत चर्चा सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या तीन अशा नऊ जणांची ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील आणि नसीम खान, शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई, तर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीची ही समिती जागावाटपासंदर्भात चर्चा करून जागावाटपाचा तिढा सोडवणार आहे. कोणत्या पक्षाकडे कोणता मतदारसंघ गेल्यास विजयाची शक्यता अधिक आहे हा निकष समोर ठेवून ही समिती जागावाटपावर चर्चा करेल. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळावा म्हणून लवकरात लवकर जागावाटप पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

प्रचंड रस्सीखेच होणार!

तीनही पक्षांनी लोकसभेची निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतल्याने लोकसभेच्या जागावाटपात प्रचंड रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कारण हे तिन्ही पक्ष प्रथमच एकत्र निवडणूक लढविणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सत्तेत सहभागी झालेल्या खासदारांचा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार हे ठरवताना या समितीची कसोटी लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in