गडचिरोलीत भीषण अपघात; भरधाव ट्रकने व्यायाम करणाऱ्या ६ मुलांना चिरडलं, चौघांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. आरमोरी-गडचिरोली महामार्गावर काटली गावाजवळ हा भीषण अपघात झाला.
गडचिरोलीत भीषण अपघात; भरधाव ट्रकने व्यायाम करणाऱ्या ६ मुलांना चिरडलं, चौघांचा मृत्यू
Published on

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. आरमोरी-गडचिरोली महामार्गावर काटली गावाजवळ हा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या सहा अल्पवयीन मुलांना भरधाव ट्रकने चिरडले. या दुर्घटनेत ४ मुलांचा मृत्यू झाला असून २ गंभीर जखमी आहेत.

ही घटना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. ही ६ मुले काटली गावातील असून हे गाव जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १२ किमी अंतरावर आहे. स्थानिक पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुले रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होती. तेव्हा एका अज्ञात ट्रकने मोठ्या वेगात येत त्यांना धडक दिली. अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेत २ मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर ४ मुलांना गडचिरोली सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान आणखी २ मुलांनी प्राण सोडले. उर्वरित दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने नागपूरच्या रुग्णालयात हेलिकॉप्टरने हलवण्यात आले आहे.

या अपघातात १४ वर्षीय टिंकू नामदेव भोयर, दुषण दुर्योधन मेश्राम, तुषार राजेंद्र मारभते आणि १६ वर्षीय तन्मय बालाजी मानकर यांचा करुण अंत झाला.

घटनेनंतर काटली गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अपघातस्थळी भेट दिली. तसेच, कुटुंबांचे सांत्वन केले असून ग्रामस्थांना शांततेचे आवाहनही केले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमी मुलांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे लिहिले, "गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.''

सध्या पोलिसांकडून ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in