पुणे : भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची २६ मे रोजी जयंती आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या या अजरामर नाटककाराच्या पुण्यातील पुतळा विटंबना घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. पुतळ्याशिवाय संभाजी उद्यानात असलेला चौथरा आजही प्रतीक्षा करीत आहे. हा पुतळा त्याच जागी बसविण्याचा ठराव पुणे महापालिकेने २०१७ साली एकमताने मंजूर केला; परंतु कार्यवाही नाही. एरव्ही गडकरींच्या नावाने टाहो फोडणारे तथाकथित साहित्यिक, नाटककार, कलाकार, नेतेमंडळी सर्वकाही विसरले आहेत. गडकरी आमचेच म्हणून मिरवणाऱ्या सीकेपी संघटना गप्पच आहेत. ज्ञातीच्या अस्मितेच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठविण्याऐवजी इतर दिखावू उत्सवात मग्न आहेत.
२ जानेवारी २०१७ रोजी संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. चार तरुणांनी पहाटे हातोड्याने पुतळा फोडला, पुतळा पाण्यात पडला. पाण्यातील पुतळा काढून ते चौघेजण मुठा नदीच्या कडेने जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. नाटककाराचा पुतळा काढणे हे घृणास्पद कृत्य घडले. गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकात छत्रपती संभाजीराजांची बदनामी झाली असे कारण सांगितले. परंतु शंभर वर्षांपूर्वीचे ते नाटक संभाजीराजांची स्तुती करणारेच होते, अशीच गडकरीप्रेमींची मनोभूमिका आहे.
राम गणेश गडकरी यांच्या ४३व्या पुण्यतिथीनिमित्त २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. शिल्पकार ए. वा. केळकर यांनी हा पुतळा साकारला होता. पुतळ्याच्या कोनशिलेवर ‘राजसंन्यास’ या नाटकाबरोबरच 'एकच प्याला, भावबंधन, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास' या नाटकांची नावे व एक कविता कोरण्यात आली होती. नाटककार राम गणेश गडकरी म्हणजे मराठी भाषेचा डौल होता. खरंतर नाटककार, कलाकार जातीपातीपलीकडे असतात. तरीही जातीय विद्वेशातून पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दोन-चार दिवस आंदोलने झाली. त्यानंतर श्रीवर्धन येथे झालेल्या सीकेपी अधिवेशनात राणाभीमदेवी गर्जना करण्यात आल्या. अधिवेशन संपले आणि सगळेच विसरले.
राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना गैरसमजातून झाली हे सत्यही आता बाहेर आले आहे. अशा वेळी सर्वांनी पाठपुरावा करून राम गणेश गडकरी यांना जिवंतपणी न्याय देता आला नाही तरीही त्यांच्या मृत्यूपश्चात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. खरंतर ज्ञातीच्या अस्तित्वाच्या मूलभूत समस्येची जाणीव हवी आहे. पुणेकर किंवा अवघा महाराष्ट्र पुतळा विटंबना प्रकरण विसरले असले तरीही राम गणेश गडकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत, हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार असल्याचे बोलले जात आहे.