पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; आरोपीस अटक

पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला या तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत पुणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे.
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; आरोपीस अटक
Published on

पुणे : पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला या तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत पुणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपी सुरज शुक्लाला (रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी गांधी पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले.

आरोपी सुरज शुक्ला हा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढल्यावर त्याने कोयत्याने पुतळ्यावर वार केले. ही बाब त्याठिकाणी असलेल्या लोकांनी पाहिल्यावर त्यांनी त्याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील वाराणसीचा रहिवासी असून रुद्राक्ष विक्रीचे काम करत असल्याचे आढळून आले आहे. उत्तर प्रदेशमधून तो साताऱ्यातील वाईला काही दिवस आला होता. त्यानंतर तो दीड महिन्यापूर्वी पुण्यात विश्रांतवाडी येथे राहण्यास आला. सुरज शुक्ला हा कोणत्या संघटनेशी, पक्षाशी संबंधित आहे का? त्याने हे कृत्य करण्यामागे नेमके कारण काय? याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत. शहाळे विक्रीच्या निमित्ताने त्याने कोयता खरेदी केल्याचे दिसून येत असून गांधी पुतळा विटंबना करण्यामागील त्याचा उद्देश काय, याची चौकशी करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, सुरज शुक्लावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या बहिणीचे निधन झाल्याने तीन महिन्यांपासून तो नैराश्यामध्ये होता. तो धार्मिक पुस्तकेदेखील वाचत होता. त्याच्याजवळ काही पुस्तके आढळून आली आहेत. आतापर्यंत तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का, याची माहिती मिळालेली नाही. चौकशीमध्ये त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नारळ सोलण्यासाठी वाई येथून त्याने कोयता खरेदी केला होता. त्याचबरोबर कुंभमेळ्यालासुद्धा तो जाऊन आला होता. तीन महिन्यांपासून तो देवदर्शन करत होता. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याची बायको माहेरी निघून गेली होती.

कॉँग्रेसचे आंदोलन

या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलन करत आरोपीच्या पूर्वेतिहासाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आरोपीला 'मनोरुग्ण' ठरवू नये, या संपूर्ण प्रकरणाचा व्यवस्थित तपास करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सोमवारी सकाळी काँग्रेसने पुतळ्याच्या ठिकाणी आंदोलन केले व आंदोलनानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, सध्या समाजात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. राज्यकर्त्यांच्या दबावामुळे पोलीस या घटनांची गंभीर दखल घेत नाहीत. त्यामुळेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचे धाडस वाढत आहे.

हा भारताच्या आत्म्यावर घाव - सपकाळ

महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील हल्ला नाही, तर हा भारताच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. तो संघ आणि भाजपने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला आलेले फळ आहे. या विषवल्लीचा धोका संपूर्ण देशाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. या विषवल्लीचा बंदोबस्त केला पाहिजे. गांधींच्या पुतळ्यावर हल्ला करून गांधी विचार संपणार नाही. गोडसे विचार हा विनाशाचा मार्ग आहे, गांधी विचार हीच देशाची दिशा आणि सत्य आहे, असेही सपकाळ म्हणाले.

पुतळा विटंबनेचे सभागृहात पडसाद

पुण्यात रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. याचे पडसाद सभागृहातही उमटले. “महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सुरज शुक्ला नामक एका माथेफिरूने कोयत्याने हल्ला केला. त्याचे चित्रीकरण केले आणि ते समाजमाध्यमावर व्हायरल केले. ही अत्यंत गंभीर आणि संताप आणणारी घटना आहे. राज्य सरकारने याबाबत कडक कारवाई करावी,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सभागृहात केली.

logo
marathi.freepressjournal.in