गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना यंदा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दरवेळी उशिरा मिळणारा पगार यंदा कर्मचाऱ्यांना बाप्पाच्या आगमनाआधीच मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासूनच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळाल्याने नाराजी होती. महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यात पगार मिळाल्यामुळे त्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक ताण सहन करावा लागत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून सातत्याने वेळेवर वेतनाची मागणी केली जात होती.
राज्य शासनाने आधीच सरकारी अधिकारी-कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना गणेशोत्सवाआधी पगार देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळावा यासाठी पुढाकार घेण्यात आला. वित्त विभागाने पगार पाच दिवस आधीच देण्यास मान्यता दिली असून यामुळे ७ ते १० तारखेदरम्यान मिळणारा पगार उद्याच मिळणार आहे.
गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्टला होत असून यंदा एसटी कर्मचाऱ्यांचा सण खऱ्या अर्थाने सुखाचा ठरणार आहे.