पुढील आठवड्यात सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. चाकरमनी पुढील दोन दिवसांत कोकणाची वाट धरणार आहेत. याच आनंदोत्सवात राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा देणारा निर्णय दिला आहे. यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी करण्यात आली आहे. याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या अखत्यारीतील सर्व टोल नाक्यांवर टोलमाफी करण्यात आली आहे. यासाठी 'गणेशोत्सव २०२५ - कोकण दर्शन' या विशेष टोलमाफी पासची सुविधा देण्यात येत आहे.
विशेष पास कुठे मिळेल?
या योजनेसाठी शासनाकडून 'गणेशोत्सव २०२५ - कोकण दर्शन' नावाचे विशेष टोलमाफी पास जारी केले जाणार आहेत.
पासवर वाहन क्रमांक आणि वाहनमालकाची माहिती नोंदवली जाईल.
हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील.
परतीच्या प्रवासासाठीदेखील याच पासचा उपयोग करता येईल.
वेळेत पास वितरित करण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांचा समन्वय साधून हे पास वेळेत वितरित करावेत, जेणेकरून भाविकांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये. यासंदर्भात जाहीरात आणि सूचना प्रसिद्ध करून नागरिकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
लाखो भाविकांना दिलासा
मुंबईसह कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव म्हणजे गावी जाऊन बाप्पाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा खास आनंद असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक कोकणात जाणार असल्याने टोलमाफीचा निर्णय त्यांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.