
पुणे : गेल्या ३० सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ झालेल्या अपघातात गौतमी पाटील यांच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे यांच्यासह दोन प्रवासी जखमी झाले. अपघाताच्या घटनेनंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग सुरू झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना नृत्यांगना गौतमी पाटील यांनी ८ ऑक्टोबर रोजी पुण्यात पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की, अपघाताच्या वेळी ती गाडीत नव्हत्या, आणि पोलिसांनी देखील ही तथ्ये पुष्टी केली आहेत. “माझी यात काही चूक नसताना मला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. अपघाताच्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही,” असे गौतमी पाटील यांनी स्पष्ट केले.
गौतमी पाटील म्हणाल्या की, अपघाताची माहिती मिळताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी आपल्या मानलेले भाऊ पैसे घेऊन अपघातग्रस्त रिक्षावाल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पाठवली होती; मात्र, कुटुंबीयांनी ही मदत स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता भासली नाही.
गौतमी पाटील यांनी सांगितले की, पोलीस चौकशीत त्यांनी पूर्ण सहकार्य केले असून, गाडीची कागदपत्रे, चालकाचे तपशील आणि अपघाताच्या वेळी त्या कुठे होत्या, याची सगळी माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी कॅमेरे, लोकेशन तपासले आणि गौतमी पाटील या ठिकाणी नसल्याचे स्पष्ट झाले.
अपघाताची जबाबदारी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीवर होती, कारण चालकाने देवदर्शनासाठी गाडी घेऊन जाण्याची परवानगी घेतली होती. पोलिसांनी गौतमी पाटील यांना क्लीन चिट दिली आहे. पत्रकारांच्या एका प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाल्या की, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “गौतमीला कधी अटक होणार?” असा प्रश्न विचारला होता, पण कदाचित त्यांना प्रकरणाची खरी माहिती नव्हती. पोलिसांनी त्यांना योग्य माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.