२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

ज्या जिल्ह्यांमध्ये २ डिसेंबरला मतदान होणार आहे, त्या भागातील मतदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाची जागा कोणतीही असली तरी भरपगारी रजा देणे अनिवार्य असेल.
२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...
Published on

राज्यात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका आणि नगर पंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा (Paid Holiday) देण्याचे आदेश सरकारने शुक्रवारी (दि.२८) जारी केलेल्या शासन निर्णयातून स्पष्ट केले.

मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना रजा बंधनकारक

शासन निर्णयानुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये २ डिसेंबरला मतदान होणार आहे, त्या भागातील मतदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाची जागा कोणतीही असली तरी भरपगारी रजा देणे अनिवार्य असेल.

दीर्घकाळ प्रलंबित निवडणुकांचा पहिला टप्पा

राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतींच्या रखडलेल्या निवडणुकांचा पहिला टप्पा २ डिसेंबरला होत आहे. मागील निवडणुकांमध्ये काही आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना रजा न दिल्याने अनेक मतदारांना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे यावेळी १९५१ च्या जनप्रतिनिधित्व कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने स्पष्ट केले.

सर्व कार्यालयांना आदेश लागू

कारखाने, दुकाने, हॉटेल्स, आयटी कंपन्या, मॉल्स, रिटेल आउटलेट्स तसेच इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठीही हा आदेश लागू असेल.

अत्यावश्यक सेवांसाठी विशेष सवलत

अत्यावश्यक किंवा सतत चालणाऱ्या सेवा देणाऱ्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्याने, त्यांनी कर्मचाऱ्यांना किमान २–३ तास मतदानासाठी विशेष रजा द्यावी, असेही शासनाच्या निर्णयामध्ये नमूद केले आहे.

पालन न केल्यास कारवाई

जर कोणत्याही आस्थापनाने भरपगारी रजा किंवा मतदानासाठी आवश्यक वेळ दिल नाही आणि याबद्दल तक्रार आली तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सूचना सरकारकडून करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in