पुणे : शिक्षण घेण्याची कितीही जिद्द असली आणि गरज पडल्यास शैक्षणिक कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी आजच्या काळात नोकरी मिळेलच याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. ही आजच्या व्यवस्थेची सर्वांत मोठी शोकांतिका आहे, अशी चिंताजनक भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली.
राष्ट्रीय मजदूर संघाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना सपकाळ यांनी सध्याच्या शैक्षणिक आणि रोजगार व्यवस्थेवर टीका केली. यावेळी विधान परिषद आमदार भाई जगताप, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुनील शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, त्यांच्या लहानपणी वडीलधारी मंडळी ‘शिक्षण घे, कुठेतरी नोकरी मिळेल आणि तुझा प्रपंच सुरू होईल,’ असा सल्ला देत असत. मात्र, आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. उच्च शिक्षण घेऊनही तरुणांचे भविष्य अंधारात दिसत आहे. देशातील बेरोजगारीची परिस्थिती गंभीर असून, अशा स्थितीत कामगार कायद्यांमध्ये करण्यात येणारे नवे बदल कामगार तसेच सुशिक्षित तरुणांच्या अडचणी वाढविणारे आहेत. हे बदल कामगारांना अधिक असुरक्षित करणारे असून त्यांना कंत्राटी व्यवस्थेवर अवलंबून ठेवणारे आहेत. त्यामुळे या अन्यायकारक बदलांविरोधात सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन ठाम भूमिका घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कामगार कायदे मोडीत काढण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गाने लढा उभारला पाहिजे, असे आवाहनही सपकाळ यांनी केले.
आमदार भाई जगताप यांनी कामगारांना संघटित होण्याचे आणि मनातील भीती दूर करण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी यांनी सर्वसामान्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. त्याचप्रमाणे आजच्या कामगारांनीही भीती झटकून संघटित व्हावे, असे ते म्हणाले. कंत्राटीकरण आणि बेरोजगारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी कामगारांची एकजूट आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.