पावसाचा तडाखा, राज्यात सहा जणांचा मृत्यू, १२ जखमी

राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळं घडलेल्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.
पावसाचा तडाखा, राज्यात सहा जणांचा मृत्यू, १२ जखमी
Published on

मुंबई : जवळपास महिनाभर मुक्काम ठोकलेल्या पावसाने गुरुवारी राज्याला चांगलाच तडाखा दिला. राज्यातील विविध जिल्ह्यांत घडलेल्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. पुण्याबरोबरच मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला बुधवारी रात्रीपासून पावसाने झोडपून काढले. मुंबईत पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतूक मंदावली. कोल्हापूरमध्ये पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने सांगली, कोल्हापूर भागात पुराचे पाणी शिरले आहे. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गात 'ऑरेंज अलर्ट', तर रायगड रत्नागिरीत 'रेड अलर्ट' जारी केले आहे. त्यामुळे या भागातील शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पुण्यात बुधवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर गुरुवारीही कायम होता. पुण्यात ढगफुटी झाल्याने पुणे जलमय झाले आणि हाहाकार उडाला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही पावसाचे थैमान सुरू असून जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईलाही गुरुवारी संततधार पावसाने झोडपून काढले. पहाटेपासून पावसाने जोर पकडला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सायन येथील गांधी मार्केट, चुनाभट्टी, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, चेंबूर आदी सखल भागात पाणी साचले. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्यात दुपारी समुद्राला भरती व हवामान विभागाने पावसाचा ‘रेड अलर्ट’ जाहीर केल्याने दुपारी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वेसेवा उशिराने धावल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने वाहतूककोंडीत अनेकांना अडकावे लागल्याने कामाच्या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला.

पावसामुळं कुठे, काय घडलं?

  • मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार

  • कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

  • आर्मी, नेव्हीच्या तुकड्या ‘अलर्ट’ मोडवर

  • राज्यातील ९ जिल्ह्यांत शाळांना सुट्टी

  • रेल्वे, रस्ते वाहतूक मंदावली

  • मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गात ‘ऑरेंज अलर्ट’

  • रायगड, रत्नागिरीत ‘रेड अलर्ट’

  • २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

बारवी धरणात दोन जण बुडाले:

बारवी धरणाच्या जल प्रमोद क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे गणेश चिंधू केणे (३५) व ज्ञानेश्वर बुधाजी गोंधळी (३५) हे दोघे जण बारवी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये टाकीची वाडी येथून वाहून गेले. महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच अग्निशामक दलाच्या जवानांकडून घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, बारवी धरणात पर्यटकांची गर्दी वाढत असल्यामुळे प्रशासनाने पर्यटकांवर बंदी घातली.

logo
marathi.freepressjournal.in