
मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली असून पावसाने हाहाकार उडवला आहे. सोमवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे जनावरे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तसेच लोकांच्या घरात पाणी शिरले असून उभी पिके वाया गेल्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहू लागला आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले. तर धाराशीव येथे हेलिकॉप्टरने २७ जणांना सुखरूपपणे वाचवण्यात आले असून २०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात ‘एनडीआरएफ’च्या १७ टीम तैनात असून अतिरिक्त हेलिकॉप्टर मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्यदलाशी चर्चा केली आहे. अहिल्यानगर, बीड, परभणी आदी जिल्ह्यात ८७५.५ मिमी पाऊस पडला असून सरासरीपेक्षा १०२ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मराठवाड्यात बीड, परभणी, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळित झाले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात प्रचंड नुकसान झाले असून पावसामुळे आतापर्यंत आठ जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये लातूरमधील तीन, धाराशीवमधील एक, बीडमधील दोन व नांदेडमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मराठवाड्यात १५० हून अधिक जनावरे दगावली आहे. त्यापैकी एकट्या बीड जिल्ह्यात ६० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. बीड, छत्रपती संभाजीनगर व धाराशिवमधील ६५ हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटींचा निधी
राज्यात जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
धुळे, जळगाव, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत मदतकार्य
धाराशीव, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. या भागांत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि निवाऱ्याची व्यवस्था सरकारने केली आहे. पूरामुळे जमिनी खरडून गेल्याच्या तक्रारींवर सरकार सकारात्मकपणे मदत करेल.
पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागात जाण्याची सूचना
अमरावती, बीड, परभणी, अकोला आदी जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. लोकांच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणा कामाला लागल्या असून संबंधित जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी मदतीसाठी धाव घ्यावी, अशी सूचना फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना केली आहे.
जाहिरातींपेक्षा शेतकऱ्यांना मदत करा - उद्धव ठाकरे
सरकारने स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या. ओल्या दुष्काळाचे निकष बाजूला ठेवून अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींची आर्थिक मदत करावी. महायुतीचा एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय. साधी हेलिकॉप्टरनेसुद्धा पूरपरिस्थितीची पाहणी करायला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्हीसमोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - वडेट्टीवार
राज्यात इतके नुकसान झाले आहे, पालकमंत्री अजून त्या जिल्ह्यात पाहणी करायला गेलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यात पिकांचे, जनावरांचे तसेच लोकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
खासदार ओमराजे थेट पुराच्या पाण्यात
लातूर, नांदेड, बीड, अहिल्या नगर आदी जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला. सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली आणि लोकांच्या घरात पाणी शिरले. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आणि लोकांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना त्यांनी सुखरुप बाहेर काढले.
शुक्रवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार
२६ सप्टेंबरपासून पुन्हा ५ दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, खानदेश वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदुर्ग वगळता मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.