
काल भाजपचा प्रचार करण्यासाठी (Kasaba By Election) भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. नाकात नळी, सोबत ऑक्सिजनचा सिलेंडर आणि व्हीलचेअरवरून त्यांनी प्रचाराला हजेरी लावली. अशामध्ये पुण्यात चर्चांना उधाण आले. 'आजारी असतानाही भाजपच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांना मैदानात यावे लागले. त्यांची अवस्था पाहून आज मी प्रचार करणार नाही.' असा संदेश हिंदू महासंघांचे उमेदवार आनंद दवे यांनी प्रसार माध्यमांना दिला.
हेही वाचा :
व्हिलचेअरवरुन भाजप खासदार गिरीश बापट पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचारात
हिंदू महासंघांचे उमेदवार आनंद दवे म्हणाले आहेत की, "बापट पाहून पर्रीकर आठवले, आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही, त्रास बापट साहेबांना होत होता... पण यातना आम्हाला जाणवत होत्या. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे, याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिशः प्रचार करणार नसल्याचे ठरवले आहे" असा मेसेज त्यांनी सर्व माध्यमांना पाठवला आहे.
ते म्हणाले आहेत की, "भाजपचा हा सगळा प्रयत्न फक्त पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सुरु आहे. यासाठी भाजप गिरीश बापट यांना मैदानात उतरवत असेल, तर त्यासाठी हिंदू महासंघ कारणीभूत असल्यास त्याच्या यातना आम्हाला होत आहेत. काल गिरीश बापट यांना पाहून मला दुःख झाले. त्या गोष्टीचा आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नाही." असे जाहीर केले.