हिंजवडीतील एका अंगणवाडीत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली होती, त्याच अंगणवाडी सेविकेने चक्क २० चिमुकल्यांना आत कोंडून मीटिंगसाठी निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकटी सोडलेली ही मुले घाबरून रडू लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या भीतीने भरलेल्या नजरा, दाराजवळ उभी राहून मदतीची आर्त हाक आणि रडण्याचे आवाज पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.
ग्रामपंचायतीतील बैठकीसाठी प्रताप
ही घटना हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. चौकशीदरम्यान समोर आले, की अंगणवाडी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे या दोघी ग्रामपंचायतीतील बैठकीसाठी जाण्यासाठी अंगणवाडीत कुलूप लावून निघून गेल्या. बैठक माजी सरपंचांच्या बोलावण्यावरून होती, अशी माहिती मिळते. मात्र, केवळ उपस्थिती दाखवण्यासाठी २० निरागस मुलांचा जीव धोक्यात टाकणे हा गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार असल्याची टीका नागरिक करत आहेत.
अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मुलांची सुटका
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मुळशी पंचायत समितीला माहिती दिल्यानंतर बालविकास विभागाचे अधिकारी धनराज गिरम यांनी त्वरीत हस्तक्षेप केला. त्यांनी दोन्ही महिलांना बैठक सोडून लगेच अंगणवाडीकडे परतण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुलांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही शारीरिक दुखापत झाली नसली, तरी या तणावपूर्ण प्रसंगामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुलांच्या संरक्षणासाठी असलेल्या जागेत अशी बेफिकीर वागणूक कशी झाली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात दोन्ही कर्मचारी महिलांवर कोणती कारवाई होणार, तसेच बालविकास विभाग अधिकृत चौकशी करत दोषींना कोणती शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.