
पुणे : पुण्यात व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो) आग लागली होती. यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. या बसला लागलेली ही आग घातपात असल्याचे समोर आले आहे. बसचालकानेच पगार कापल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली.
पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीचे 12 कर्मचारी बसमधून जात होते. त्या मिनी बसला आग लागली. त्यात सुभाष भोसले, शंकर शिंदे , गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार अपघात वाटत होता. परंतु हा अपघात नाही तर घातपात असल्याचे समोर आले आहे. बस चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच हा प्रकार केला आहे.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की, व्योम ग्राफिक्स कंपनीतील कामगारांचा वाद आणि दिवाळीत मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली. चालक हंबर्डीकरने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे.
आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. दुसऱ्या दिवशी चालकाच्या सिटच्या खाली केमिकलची बॉटल ठेवली. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या. हिंजवडीजवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला. त्यात चौघांचा मृत्यू झाला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.