Women's Day 2026 : राज्यात HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात; एचपीव्ही म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व

या मोहिमेअंतर्गत १४ वर्षे पूर्ण झालेल्या पण १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना 'गार्डसिल-४' लसीचा एक डोस मोफत देण्यात येणार आहे.
Women's Day 2026 : राज्यात HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात; एचपीव्ही म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व
(Photo-@erdemhospital)
Published on

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्यातील महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्चपासून राज्यभर 'एचपीव्ही' (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १४ वर्षे पूर्ण झालेल्या पण १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना 'गार्डसिल-४' लसीचा एक डोस मोफत देण्यात येणार आहे.

महिलांच्या आरोग्य हक्कांना बळ देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा लाभ राज्यातील सुमारे ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना मिळणार आहे. ही लस पूर्णपणे मोफत असून पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात दिली जाणार आहे.

एचपीव्ही (HPV) म्हणजे नेमके काय?

एचपीव्ही (Human Papillomavirus) हा एक प्रकारचा विषाणू आहे, जो मुख्यतः त्वचा आणि शारीरिक संपर्काद्वारे पसरतो. या विषाणूचे अनेक प्रकार असले तरी एचपीव्ही प्रकार १६ आणि १८ हे महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रमुख कारण मानले जातात.

जगभरात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग हा गंभीर आजारांपैकी एक आहे. भारतातील महिलांच्या कर्करोगांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे ८० हजार नवीन रुग्ण आढळतात, तर ४२ हजारांहून अधिक महिलांचा मृत्यू या आजारामुळे होतो.

एचपीव्ही लसीकरण का महत्त्वाचे?

तज्ज्ञांच्या मते, एचपीव्ही लस गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी प्रभावी मानली जाते. ही लस शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार करून कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूपासून संरक्षण करते.

विशेषतः किशोरवयीन मुलींना लस दिल्यास भविष्यात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अनेक देशांनी एचपीव्ही लसीकरणाला मोठे महत्त्व दिले आहे.

तीन महिन्यांचे विशेष अभियान

राज्यात ही लसीकरण मोहीम सलग तीन महिन्यांसाठी विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार आहे. त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग बनविण्यात येईल.

लसीकरणाची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणार आहे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे.

याशिवाय सर्व लाभार्थ्यांची नोंदणी आणि लसीकरण प्रमाणपत्राचे वितरण केंद्र शासनाच्या U-WIN डिजिटल पोर्टलद्वारे केले जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in