"महाविकास आघाडीच्या पत्रावरील 'ती' सही मी व्यक्तिगत मानतो", प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

माझी काँग्रेस प्रभारींसोबत झालेल्या चर्चेनुसार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना अधिकार दिले आहेत. मग नाना पटोले यांनी...
"महाविकास आघाडीच्या पत्रावरील 'ती' सही मी व्यक्तिगत मानतो", प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

"केंद्रात पुन्हा भाजप सरकार येणार नाही, यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड देऊ देणार नाहीत, मात्र, महाविकास आघाडीने जे पत्र दिले त्यावर नाना पटोले यांची सही आहे. अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात जागा वाटपाबाबत चर्चा करतील, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांच्याकडून सांगण्यात आले होते. नाना पटोले यांना कोणतेही अधिकार नाहीत. त्या पत्रकारवरची सही मी व्यक्तगत मानतो", असे म्हणत अजूनही वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याचे मी मानायला तयार नाही, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. हवेत पतंग उडवल्यासारखी यांची चर्चा होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासाठी त्या पत्राला किंमत आहे. पत्रावर नाना पटोलेंची सही ही त्यांची व्यक्तिगत मानतो, ती काँग्रेसची नाही. माझी काँग्रेस प्रभारींसोबत झालेल्या चर्चेनुसार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना अधिकार दिले आहेत. मग नाना पटोले यांनी कोणाच्या सांगण्यावरुन सही केली, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच, काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका मांडावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. पण, काँग्रेसकडून अजून कोणताही निर्णय झाल्याचे दिसत नाही. काँग्रेसचे प्रभारी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचीही त्या पत्रावक सही दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीला मी, रेखा ठाकूर, धैर्यवान पुंडकर उपस्थित राहु. आम्ही 12-12 मांडला आहे. पण, महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत या बैठकीत काय होते हे बघू, असेही ते म्हणाले.

25 मुद्यांवर महाविकास आघाडीने भूमिका मांडावी-

मराठा समाजाचे आंदोलन, तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादी सराकारने मिळून 2006 साली खासगी बाजार समिती कायदा बनवला होता. अशा 25 मुद्यांवर महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर किमान कार्यक्रम ठरवला जाईल, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडी विस्कटली तशी...

या सर्व गोष्टींवर तोडगा निघाला तर पुढे जाऊ शकतो. नाहीतर इंडिया आघाडी विस्कटली तशीच महाविकास आघाडीही तुटू नये ही चिंता आम्ही जाहीर केली आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आंबेडकर यांनी घेतलेल्या या भूमिकेवर महाविकास आघाडी तसेच काँग्रेसकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in