
महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचे वस्त्रहरण होत आहे. ते थांबवण्यासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाविकास आघाडीची ही वज्रमूठ तयार झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या वज्रमुठीच्या एकाच ठोश्यात जमीन काय असते, ते अमित शहांना दाखवून देईल, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडायला गेला तर त्याचे आम्ही तुकडे करू. मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी तिचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. यामागे यांची भांडवलदारी वृत्ती आहे. हिंमत असेल तर लोकसभेसोबत विधानसभा, महापालिका निवडणुका एकत्रच घ्या, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते. अजित पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे आदी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. मुंबई ही राजधानी आंदण म्हणून मिळालेली नाही. ती लढून मिळवली असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मला मिंध्यांना एकच सांगायचे आहे की, मुंबईसाठी जर हुतात्म्यांनी संघर्ष केला नसता तर आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकला नसता. त्यावेळी लोकांवर गोळीबार झाला, गिरणगाव पेटला होता. महिला देखील म्हणाल्या होत्या, हवे तर गोळ्या घाला आम्हाला, पण मुंबईसह महाराष्ट्र मिळवणारच. आता केवळ खुर्चीसाठी मुंबई आणि महाराष्ट्रावरचा अत्याचार बघत बसला आहात. पंतप्रधान म्हणतात, काँग्रेसने ९१ वेळा शिव्या दिल्या. मोदीसाहेब शिव्या देण्याचे मी समर्थन करत नाही. पण, तुम्हाला जेव्हा वाटते काँग्रेस शिव्या देते, मग तुमचे टिनपाट ज्यावेळी मला, आदित्यला बोलतात, त्यांना का नाही बोलत. अद्यापही माझा शिवसैनिक त्या भाषेत बोलत नाही. त्या टिनपाटांच्या भोकांना बुचं लावली तरच चांगले होईल. तुमचे लोक गप्प बसले तरच आमचे लोक गप्प बसतील,’’ असेही ते म्हणाले.
‘‘सरकार होते तेव्हा बोंब काय मारत होते की, मी शरद पवारांच्या अंमलाखाली होतो. पण, आता उदय सामंत शरद पवारांना भेटायला गेले ना. मग का सल्ला घ्यायला जाता त्यांचा तुम्ही. पालघरमध्ये आदिवासींच्या घरात पोलीस का घुसवले. मुंबईची जमीन बुलेट ट्रेनच्या घशात घातली. बीकेसीची जागा जिथे कोविड सेंटर उभारले ती सोन्यासारखी जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली. मुंबईतील किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या आरे कारशेडला स्थगिती दिली होती. कांजूरची जागा सुचविली होती. पर्यावरणाचे रक्षण हाच माझा हेतू होता, पण केंद्र सरकारच त्या विरोधात न्यायालयात गेले. आता कांजूरला पण कारशेड करणार आहेत. मग आमचे सरकार गेल्यानंतर अशी काय जादू झाली की कांजूरची जागा तुम्हाला मान्य झाली,’’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
‘‘मुंबई, महाराष्ट्रातून एक-एक करून उद्योग बाहेर नेत आहेत. एसीसी, अंबुजा सिमेंट अदानीने विकत घेतल्यानंतर त्यांची कार्यालये गुजरातला गेली. आर्थिक केंद्रही गुजरातला नेले. हीच भांडवलदारी वृत्ती आहे. मुंबई तोडू शकत नाही, पण जो कोणी मुंबईला तोडायचा प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू. मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईला मारून टाकायचे, ही यांची भांडवलदारी वृत्ती आहे. कारण देशात सर्वात जास्त महसूल देणारे शहर हे मुंबई आहे. मुंबईचे महत्त्व मारायचे. जीएसटीने उत्पन्न मारायचे. आता मुंबईच्या ठेवींवर यांचा डोळा आहे. बाळासाहेबांचे विचार म्हणतात. जर बाळासाहेबांच्या विचारांचा एक कण जरी असता तर गद्दारी केलीच नसती. आपले सरकार होते तेव्हा मराठी भाषा सक्तीची केली होती. आता यांनी निर्णय फिरविला.’’ पंतप्रधानांकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती आम्ही, याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही
येत्या ६ तारखेला बारसूला जाऊन तिथल्या लोकांना भेटून बोलणार असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मला कसे काय अडवू शकता. बारसू काय पाकव्याप्त काश्मीर किंवा बांगलादेश नाही. आधी बारसूला जाणार, नंतर संध्याकाळी महाडच्या सभेला जाणार. होय ती जागा आमच्या सरकारने सुचविली होती. पण, त्या पत्रात म्हटले नव्हते की, पोलिसांना घुसवा, लाठीचार्ज करा.
अदानीचा धडा अभ्यासक्रमात घ्या
‘‘माझे मत आहे की, अदानीची चौकशी करूच नका. उलट त्यांचे आत्मचरित्र शालेय अभ्यासक्रमात लावा. श्रीमंत कसे व्हायचे, हे शिकण्यासाठी,’’ असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. देश-महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे. चीन घुसतो आहे. आपल्या देशाचा भूगोल बदलतोय. हे नाकर्ते राजकारणी आपला इतिहास बदलताहेत. हिंमत असेल तर चीनच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरी ईडी पाठवा. जाहिराती करायच्याच असतील तर २०१४ सालच्या भाजपच्याच जाहिराती दाखवा. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, ते आत्ता कळेल,’’ असेही ते म्हणाले.