नागपूरमधील महिलेने प्रेमासाठी थेट गाठले पाकिस्तान; १२ वर्षाच्या मुलाला हॉटेलमध्ये ठेवून ओलांडली सीमा

भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये वाढता तणाव असतानाच, एका महाराष्ट्रातील महिलेने प्रेमासाठी थेट पाकिस्तान गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून काही भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने सुरक्षाव्यवस्थेत खळबळ उडाली आहे.
नागपूरमधील महिलेने प्रेमासाठी थेट गाठले पाकिस्तान; १२ वर्षाच्या मुलाला हॉटेलमध्ये ठेवून ओलांडली सीमा
Published on

भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये वाढता तणाव असतानाच, एका महाराष्ट्रातील महिलेने प्रेमासाठी थेट पाकिस्तान गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून काही भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने सुरक्षाव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. पाकिस्तानात पोहोचलेल्या सुनीता जमगडे या महिलेला सुरुवातीला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले, मात्र चौकशीनंतर तिला भारताच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सुनीता जमगडे (वय ४३) ही नागपूर येथील रहिवासी असून ती गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर पाकिस्तानात राहणाऱ्या झुल्फिकार नावाच्या धर्मगुरूच्या संपर्कात होती. ऑनलाइन संवादातून त्यांची ओळख वाढत गेली आणि ही ओळख मैत्रीत, पुढे प्रेमसंबंधात परिवर्तित झाली. सुनीताने त्याला प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला.

पूर्वी एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणारी सुनीता नंतर कपड्यांचा व्यवसाय करू लागली. ती घरोघरी जाऊन कपडे विकायची. तिला एक १२ वर्षांचा मुलगा आहे. कुटुंबियांना काश्मीरला सहलीसाठी जात असल्याचे सांगून ती मुलाला घेऊन घराबाहेर पडली. विशेष म्हणजे, तिने मुलाला लडाखमध्ये एका अनोळखी हॉटेलमध्ये ठेवले आणि स्वतः पाकिस्तानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याआधीही अटारी सीमेवरून दोनदा तिने पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बीएसएफने तिला परत पाठवले होते. कायदेशीर मार्ग बंद असल्यामुळे तिने लडाखमार्गे धोकादायक मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ती आपल्या मुलासह लडाखला पोहोचली. १४ मे २०२५ रोजी तिने मुलाला हॉटेलमध्ये ठेवले आणि कारगिलजवळील हुंडरमन गावातून नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. पाकिस्तानी रेंजर्सने तिला अटक केली आणि सुरुवातीला ती भारतीय हेर असल्याच्या संशयावरून तिला ताब्यात ठेवले. मात्र, चौकशीदरम्यान तिने सर्व माहिती स्पष्टपणे सांगितल्यावर पाकिस्तानने भारताशी संपर्क साधून तिला परत पाठवले.

तिला २७ मे रोजी अमृतसरमधील अटारी सीमेवर भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) स्वाधीन करण्यात आले. बीएसएफने तिला देशांतर्गत सुरक्षिततेच्या चौकटीत परत आणले.

लडाखचे पोलीस महासंचालक डॉ. एस. डी. सिंह जामवाल यांनी स्पष्ट केले की, सुनीता पाकिस्तानात जाण्यापूर्वी पाकिस्तानातील नागरिकांच्या संपर्कात होती. या प्रकरणी अमृतसर पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून ती नोंद नागपूरमधील कपिल नगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडणाऱ्या व्यक्तींची अनवधानाने होणारी देवाणघेवाण ही नियमित प्रक्रिया असते. अशा प्रकरणांचे निराकरण सहसा ध्वज बैठका व परस्पर चर्चांद्वारे केले जाते. सुनीता जमगडेचा मुलगाही लवकरच नागपूरला परत आणला जाणार आहे. सध्या तो बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

सुनीता बेपत्ता झाल्यानंतर तिच्या भावाने नागपूरमधील कपिल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांनी सांगितले की, ती मानसिक तणावाखाली होती आणि यापूर्वीही तिच्यावर नागपूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणा तिची सखोल चौकशी करत आहेत. कारगिलसारख्या अत्यंत संवेदनशील भागातून एलओसी ओलांडण्याची ही घटना गंभीर मानली जात असून, तिचे पाकिस्तानातील संबंध फक्त प्रेमापुरतेच मर्यादित होते का, की आणखी काही दुवे आहेत, याचा तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in