

पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेचा करोडो रुपयांचा व्यवहार गोखले बिल्डर यांनी रद्द करण्याबाबत ट्रस्टींना मेल केला आहे. जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग हाऊसला २३० कोटी रुपये देण्यात आले होते. ते विशाल गोखले यांनी लवकरात लवकर परत देण्यात यावेत, अशी मागणी ई-मेलमध्ये केली आहे. मात्र, धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंगचे हे २३० कोटी रुपये गोठवले आहेत. पुढील कार्यवाही होण्यापूर्वी ट्रस्टींना हे २३० कोटी रुपये काढता येणार नाही, असा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे.
यापूर्वी काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, जोपर्यंत कायदेशीररित्या संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरूच राहणार आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली. हा समाजाचा मोठा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.
या व्यवहारातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी केली आहे. जोपर्यंत कायदेशीररित्या डील रद्द होत नाही, तोपर्यंत मोर्चा निघेल आणि हा मोर्चा ट्रस्टींच्या विरोधात निघेल, असे महाराजांनी स्पष्ट केले.