

जळगाव : जामनेर तालुक्यातील शहापूर येथे एका तरुण शेतकऱ्याने धाडस आणि प्रसंगावधान दाखवत बिबट्याशी झुंज देऊन त्याला जिवंत पकडल्याची थरारक घटना घडली आहे. मुकेश नाना डोंगरे असे या धाडसी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेत ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या या धाडसाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
बुधवारी दुपारी मुकेश डोंगरे हे शहापूर परिसरातील शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे करत होते. यावेळी अचानक एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, न डगमगता मुकेश यांनी बिबट्याशी प्रतिकार करत झुंज दिली आणि त्याला पकडून ठेवले.
या झटापटीदरम्यान बिबट्याने पंज्याने वार केल्याने मुकेश जखमी झाले. तरीही त्यांनी धैर्य न सोडता बिबट्याला आवळून धरले. ही घटना पाहून जवळील शेतांमध्ये काम करणारे इतर शेतकरी मदतीसाठी धावून आले. त्यांनीही बिबट्याला नियंत्रित ठेवण्यासाठी सहकार्य केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. जखमी मुकेश डोंगरे यांना तातडीने जामनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.