वसंतदादा पाटील यांच्या नातसूनेची भाजपवर मोहोर; एका 'अटी'साठी भाजपची निवड!

दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांची नातसून तसेच दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अखेर भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. आज सकाळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इतर पदाधिकऱ्यांसोबत जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी चर्चेनंतर जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सांगितला.
वसंतदादा पाटील यांच्या नातसूनेची भाजपवर मोहोर; एका 'अटी'साठी भाजपची निवड!
Published on

दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांची नातसून तसेच दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अखेर भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. आज सकाळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इतर पदाधिकऱ्यांसोबत जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी चर्चेनंतर जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला. याआधी त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रवेशाचे आमंत्रण आले होते. मात्र, ''माझी पक्षप्रवेशासंदर्भात एकच अट होती, ती अट भाजपने मान्य केल्याने मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले. जयश्री पाटील १८ जून रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत.

वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या जयश्री पाटील या पहिल्या व्यक्ती आहेत. त्यांचे पती दिवंगत नेते मदन पाटील यांनी सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकल्यावर त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१५ रोजी त्यांच्या निधनानंतर कॉँग्रेसमध्ये मदन पाटील यांच्या गटाचे नेतृत्व जयश्री पाटील करत होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेसने जागा न दिल्याने त्यांनी कॉँग्रेस सोबत बंडखोरी केली आणि अपक्ष राहून निवडणूक लढवली. यामुळे त्यांना कॉँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पक्ष प्रवेशाचे आमंत्रण आले होते. मात्र, त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग निवडला आहे.

जयश्री पाटील यांची अट -

यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयश्री पाटील म्हणाल्या, की ''आपल्याला कॉँग्रेस पक्षातून काढल्यामुळे आपला हा निर्णय झाला. भाजपने सन्मानाने आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. आमची एकच अट होती, की आमच्या कार्यकर्त्यांना इथे सन्मान मिळावा. ती अट भाजपने मान्य केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलले. त्यांच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा अशी इच्छा आहे. यावर त्यांनी मला ''तुम्ही काहीही काळजी करू नका. माझ्या उपस्थितीच तुमचा प्रवेश होईल'' असे सांगितले. सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनीही दिले आहे. मी आपल्या जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. भाजपकडून आपल्याला योग्य वागणूक आणि न्याय मिळेल. त्यासाठी आपल्या सर्वांना परवा (१८ जून) भाजप प्रवेश करायचा आहे.''

वसंतदादांचा स्वभाव भाजपसारखा -

''वसंतदादा पाटील यांनी हिताचे काम केले. त्यांनी तळागळाच्या माणसासाठी काम केले. त्यांचा स्वभाव हा भाजपसोबत मिळता जुळता आहे. त्यामुळे जयश्रीताई भाजपमध्ये चांगलं काम करू शकतील,'' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

वसंतदादा पाटील यांच्या घराण्यात कॉँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि जयश्री पाटील असे दोन गट आहेत. आजतागायत झालेल्या सर्व निवडणुकीमध्ये या दोन्ही गटात एकोपा दिसून आला. मात्र, जयश्री पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याने हा एकोपा आगामी निवडणुकीत तसाच राहील की त्याला तडा जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in