

रायगड : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत जोरदार राजकीय हालचाली सुरू असून, ही जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. उमेदवारी अर्जाच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या जागेसाठी सुरुवातीला मंत्री भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने शिवसेना ही जागा लढवणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र, आता अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी जुईकर यांनीदेखील उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवा द्विस्ट निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, जुईली दळवी जुईकर यांनी शिवसैनिकांसमवेत अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती लावल्याने त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत चर्चाना अधिक उधाण आले आहे. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, सुनील तटकरे हे आपल्या पुत्र अनिकेत तटकरे यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यासाठी महायुतीतील वरिष्ठ स्तरावर त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, मंत्री भरतशेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात काही पालकमंत्रीपदासंदर्भात राजकीय समन्वय झाल्याच्या चर्चामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडली जाऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, शिवसेनेतील काही नेते आणि कार्यकर्ते या भूमिकेशी सहमत नसल्याचे सांगितले जात आहे.