राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार व बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्यासोबत भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली. या लग्न समारंभात सुप्रिया सुळे या कंगना रणौतसह एकाच मंचावर थिरकताना पाहायला मिळाल्या. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खासदार सुप्रिया सुळे, खासदार कंगना रणौत आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या तिघींनी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाच्या टायटल साँगवर एकत्र डान्स केला. लग्नसमारंभात अनेक दिग्गज पाहुणे उपस्थित होते. या सेलिब्रेशनचे व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले आहेत.
लग्नातील व्हिडीओमध्ये कंगना रणौत, महुआ मोईत्रा आणि सुप्रिया सुळे एकत्र डान्स करताना दिसत आहेत. अजून एका व्हिडीओमध्ये नवीन जिंदाल आणि त्यांचे भाऊ एका जुन्या बॉलीवूड गाण्यावर नृत्य करताना दिसतात. त्यांच्या जोशपूर्ण डान्सला उपस्थित पाहुण्यांकडून टाळ्यांची दादसुद्धा मिळते.
लग्नाच्या संगीत कार्यक्रमासाठी सराव
कंगना रणौत यांनी याआधी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सरावाचे काही फोटो शेअर केले होते. त्यात त्या नवीन जिंदाल आणि इतरांसोबत दिसत होत्या. त्यांनी कॅप्शन दिले होते, "नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमासाठी सराव करताना सहकारी खासदारांसोबत काही फिल्मी क्षण.”
यशस्विनी जिंदाल यांचे शाश्वत सोमानी यांच्याशी लग्न
नवीन जिंदाल यांची मुलगी यशस्विनी जिंदाल यांनी शाश्वत सोमानी यांच्याशी लग्न केले आहे. ते उद्योगपती संदीप आणि सुमिता सोमानी यांचे पुत्र आहेत. सोमानी कुटुंब 'सोमानी इम्प्रेसा लिमिटेड आणि एजीआय ग्रीनपॅक लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून काच, सॅनिटरीवेअर आणि बांधकाम साहित्य क्षेत्रात व्यवसाय करत आहे. शाश्वत सोमानी यांनी २०२४ मध्ये कुटुंबाच्या व्यवसायात प्रवेश केला असून त्यांनी परदेशात व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे.
अजित पवारांनंतर सुप्रिया सुळेंचा डान्स व्हायरल
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या लग्नातील एक व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी नुकताच शेयर केला होता. त्यात अजित पवार यांचा वरातीतील डान्स लक्षवेधी ठरला होता.
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पांढरी शेरवानी, गॉगल आणि फेटा बांधून अजितदादा ‘झिंग झिंग झिंगाट’वर मनसोक्त नाचताना दिसून आले. त्यांच्या सोबत रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनीही धमाल उडवत वरातीला रंगत आणली होती.