कर्जत तालुक्यातील कुरकुलवाडी परिसरात एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्यात आले होते. कुटुंबाने अंत्यसंस्कारही पार पाडले. मात्र एका नागरिकाने पोलिसांना दिलेल्या गुप्त माहितीनंतर संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आले आहे. पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. त्यात मुलाचा मृत्यू हत्या असल्याचे समोर आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय घडले होते त्या दिवशी?
मृत चिमुरड्याचे नाव जयदीप गणेश वाघ असून तो केवळ अडीच वर्षांचा होता. ९ नोव्हेंबर रोजी मुलाचे आई-वडील गणेश वाघ व त्यांची पत्नी पुष्पा मजुरीसाठी गेले होते. दोन्ही मुले घरासमोर खेळत असताना शेजारी राहणारी जयवंता गुरुनाथ मुकणे यांनी जयदीपला जवळ घेतले आणि घराच्या मागील बाजूस नेले. तेथेच तिने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मुलगा बेशुद्ध झाल्याचे नाटक करत त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी जयदीपला मृत घोषित केले आणि कुटुंबाने त्या वेदनेत अंत्यसंस्कारही पार पाडले.
गुप्त माहितीने उघडकीस आला क्रूर गुन्हा
घटनेनंतर काही दिवसांनी एका नागरिकाने पोलिसांना संशयास्पद सूत्र दिले. त्यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदन करून घेतले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून झाल्याचे स्पष्ट निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी आरोपी जयवंता मुकणे हिला ताब्यात घेतले.
आरोपीची धक्कादायक कबुली
पोलिस चौकशीत जयवंताने गुन्ह्याची कबुली दिली. तिने अत्यंत थरकाप उडवणारी माहिती सांगितली. “शेजारची मुलं माझ्या मुलांना मारतात म्हणून मी रागाच्या भरात जयदीपचा जीव घेतला.” धक्कादायक बाब अशी की, घटनेच्या आदल्या दिवशी तिने जयदीपच्या ४ वर्षांच्या बहिणीलाही मारण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न फसला. दुसऱ्या दिवशी मात्र तिने छोट्या मुलाची निर्दयीपणे हत्या केली.