पुणे : कात्रजमधील प्राणी उद्यानात १६ हरणांचा गूढ मृत्यू

पुणे शहरातील कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात चार ते पाच दिवसांत तब्बल १६ हरणांचा रहस्यमय मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे : कात्रजमधील प्राणी उद्यानात १६ हरणांचा गूढ मृत्यू
Published on

पुणे : पुणे शहरातील कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात चार ते पाच दिवसांत तब्बल १६ हरणांचा रहस्यमय मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे केवळ वन्यजीवप्रेमींमध्येच नव्हे, तर संपूर्ण पुणेकर आणि प्राणी उद्यान प्रशासनातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, प्रशासनाने मृत हरणांचे नमुने तपासणीसाठी विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवले आहेत.

उद्यानात एकूण ९८ हरणे होती, त्यापैकी १६ हरणे मृतावस्थेत आढळली आहेत. त्यामध्ये १४ नर आणि दोन माद्यांचा समावेश आहे. मृत हरणे ‘चितळ’ प्रकारातील होती. राजीव गांधी प्राणी उद्यान आणि वन्यजीव संशोधन केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणी संग्रहालयात इतक्या मोठ्या संख्येने हरणांचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे मृत्यूचे प्रमाण वाढत होते, मात्र आज एकाही हरणाचा मृत्यू झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.

मृत्यूची संभाव्य कारणे

हरणांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्तात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हरणांचा मृत्यू कोणत्यातरी विषाणूजन्य आजार, अन्नातील बिघाड किंवा अचानक हवामान बदलामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रजचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार जाधव यांनीही साथीच्या आजाराची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच, प्राणी चिकित्सक आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत हरणांचे शवविच्छेदन क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र, शिरवळ आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुरोग तज्ज्ञांनी केले आहे. मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने नागपूर येथील विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र, बरेली, भोपाळ आणि ओरिसातील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. डॉ. जाधव यांनी अन्न, पाणी आणि रक्ताचे नमुनेही विश्लेषणासाठी पाठवल्याची माहिती दिली. हरणांच्या खाद्यपदार्थांमधून काही संसर्ग झाला आहे का, याचीही तपासणी केली जात आहे. रोग अन्वेषण विभाग आणि महाराष्ट्र झू ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन नमुने घेतले आहेत.

या घटनेच्या अनुषंगाने जर हा साथीचा रोग असेल, तर त्याचा मनुष्यावर काही परिणाम होऊ शकतो का? नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.

प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हरणांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, ज्यासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत प्रशासन आणि वन्यजीव विभाग यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

logo
marathi.freepressjournal.in