केतनला कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात सिया गोयलची लाय डिटेक्टर चाचणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागितली आहे.
केतनला नेमकं कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव
केतनला नेमकं कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धावसंग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलची लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (दि. २) न्यायालयात अर्ज दाखल केला. आरोपींच्या जबाबांव्यतिरिक्त केतन अग्रवालला दरीत नेमके कोणी ढकलले, हे सिद्ध करणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी किंवा ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

'धक्का कुणी दिला?' याचा शोध सुरू

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र, दोघांच्या जबाबांव्यतिरिक्त केतनला दरीत ढकलणारी व्यक्ती कोण, हे निश्चित करणारा ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळावी आणि अधिक धागेदोरे मिळावेत, यासाठी पॉलीग्राफ चाचणी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

आरोपीची संमती आवश्यक

सिया गोयलचे वकील विपुल दुशिंग यांनी सांगितले की, तपास यंत्रणेने न्यायालयात परवानगीसाठी अर्ज केला असला, तरी अशी चाचणी घेण्यापूर्वी अनेक कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तसेच, पॉलीग्राफ चाचणीसाठी आरोपीची संमती असणे बंधनकारक आहे.

पॉलीग्राफ चाचणीचा उपयोग काय?

गुन्ह्यात थेट किंवा पुरेसा पुरावा नसल्यास तपासाला दिशा मिळण्यासाठी अनेकदा पॉलीग्राफ चाचणीची मागणी केली जाते. मात्र, या चाचणीचे निष्कर्ष न्यायालयात स्वतंत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाहीत. ते केवळ तपासासाठी नवीन धागेदोरे मिळवण्यापुरतेच वापरले जातात.

केतनच्या मोबाईलमधील पुरावेही तपासाच्या केंद्रस्थानी

दरम्यान, केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर त्याचा मोबाईल काही वेळ सियाकडे होता. त्यामुळे त्या कालावधीत मोबाईलमधील कोणताही डेटा डिलीट किंवा छेडछाड करण्यात आली का, याचाही फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपास सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दिली होती.

घटनास्थळाची पुनर्रचना

तपासाचा भाग म्हणून १ जुलै रोजी पोलिसांनी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना केली. याआधी सियालाही घटनास्थळी नेण्यात आले होते. त्यावेळी डमीचा वापर करून कथितरित्या केतनला दरीत कसे ढकलण्यात आले, याची पुनर्रचना करण्यात आली होती.

प्रकरण काय आहे?

१८ जून रोजी पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासानुसार, नोव्हेंबरमध्ये केतनसोबत विवाह ठरलेली सिया गोयल हिने तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in