मुंबई : गणेशोत्सवाला अवघा एक दिवस राहिलेला असल्याने कोकणवासीयांनी आपापला गाव गाठण्यासाठी कोकण रेल्वेला पंसती दिली आहे. चाकरमान्यांसाठी यंदा कोकण रेल्वेने ३१० विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र, या सर्व विशेष गाड्या रखडल्याने चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर हाल झाले. अनेक प्रवासी अनारक्षित डब्यांमधून प्रवास करायला मिळावा म्हणून १० ते १५ तास रांगेत उभे होते. कोकण रेल्वे हा एकेरी मार्ग आहे. त्यामुळे अनेक गाड्यांना क्रॉसिंगची वाट पाहावी लागते. कोकण रेल्वेने ३०० हून अधिक गाड्या सोडल्याने या मार्गावर ताण आला असून नियमित व विशेष गाड्यांची वाहतूक रखडली आहे.
कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडल्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली रेल्वे स्थानकात सकाळी मंगळुरू एक्स्प्रेस, कोकण कन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस व जनशताब्दी एक्स्प्रेस यांच्यासह अन्य स्पेशल गाड्या या दोन ते तीन तास उशिरा येत आहेत. कोकण रेल्वेचे वेळापत्रक साफ कोलमडल्याचे दिसत आहे.
रेल्वेने आरक्षित गाड्यांसोबतच अनारक्षित गाड्याही सुरू केल्या आहेत. या गाड्यांना रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील विविध गाड्यांवर थांबे दिले आहेत. रेल्वेने एकाच वेळी इतक्या गाड्या चालवल्याने रेल्वे मार्गावर ताण आला आहे. त्यामुळे नियमित आणि विशेष गाड्या दोन्ही उशिराने धावत आहेत.
कोकणात जाण्यासाठी लाखो प्रवासी विविध स्थानकांवर तासन्तास गाड्यांची वाट पाहत उभे आहेत. गाड्या वेळेवर न आल्याने आणि गर्दीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकांना आपल्या गावी पोहोचण्यास उशीर होत आहे. गर्दी आणि गोंधळ लक्षात घेता सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.