

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे २५ वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली. दामिनी किरण पालव असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी संशयित साहिल विश्राम धुरी याला कुडाळ पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा प्राथमिक आरोप आहे.
दामिनी ही उच्चशिक्षित असून, मुंबईत नोकरीच्या मुलाखतीसाठी जाण्याची तयारी करत होती. शनिवारी ती वर्दे परिसरात आली असताना संशयित साहिलने तिला वाटेत अडवले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येते. या वादातून साहिलने दामिनीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत, पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले.
संशयिताच्या शोधासाठी कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, निवती आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तैनात करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री मठ येथून साहिलला ताब्यात घेतले.
रविवारी संशयिताला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. हत्येसाठी वापरलेले शस्त्र शोधणे, गुन्ह्यात अन्य कोणी सहभागी होते का आणि हा प्रकार पूर्वनियोजित होता का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.