कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या टेम्पोला अपघात; १० महिलांचा मृत्यू

श्रावणी सोमवारनिमित्त पुण्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराच्या दर्शनासाठी निघालेला पिकअप २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात १० महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य २५ ते ३० महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील काही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या टेम्पोला अपघात; १० महिलांचा मृत्यू
Published on

पुणे : श्रावणी सोमवारनिमित्त पुण्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराच्या दर्शनासाठी निघालेला पिकअप २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात १० महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य २५ ते ३० महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील काही महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शोभा ज्ञानेश्वर पापळ, सुमन काळूराम पापळ, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मीराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे अशी मृत महिलांची नावे आहेत. तर यात २२ महिला जखमी झाल्या असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

खेड तालुक्यातील शिव कुंडेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन असून प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात. आजचा तिसरा श्रावणी सोमवार असल्याने जवळच असणाऱ्या पापळवाडी येथील काही महिला दर्शनासाठी कुंडेश्वर येथे जात असताना पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्यादरम्यान असणाऱ्या एका नागमोडी वळणावर पिकअप टेम्पो चढावरून खाली घसरला. यादरम्यान चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो शेतामध्ये पलटी झाला. दोन-तीन वेळा पलटी झाल्याने टेम्पोतील नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातस्थळी जागोजागी फुटलेल्या बांगड्यांचा खच आणि चपलांचा ढीग होता. मैत्रिणी, आप्तेष्टांचे मृतदेह पाहून महिलांना अश्रू अनावर झाले होते. सैरभैर झालेल्या महिलांना काय करावे समजत नव्हते. यावेळी अपघात स्थळावरील आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी महिलांना सावरले. खासगी गाड्यांमधून जखमींना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागमोडी वळणावरून टेम्पो थेट खाली घसरून आल्यानंतर पलटी झाला. यामध्ये अनेक महिला गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू पावल्या. याबाबत पुढील तपास सुरू आहे. जखमींना योग्य उपचार मिळतील, यासाठीही योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दिगंबर सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हाळुंगे पोलीस स्टेशन

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

पिकअप टेम्पो दोन ते तीन वेळा पलटी झाल्याने मोठी जीवितहानी झाली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. देवदर्शनाला जात असतानाच हा अपघात झाल्याने सर्व जण हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान, खेड परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये २२ महिलांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in