
मुंबई : विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये लाडक्या बहिणींना देणार अशी ओरड महायुतीच्या नेत्यांनी केली होती. मात्र सत्तेत येताच लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून देणार अशी विचारणा सतत विरोधकांकडून होत आहे. त्यात, लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही, असे वक्तव्य महायुतीतील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचा मुद्दा गाजणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत १५०० रुपये देण्याचे जाहीर केले आणि अंमलबजावणीला सुरुवात केली.
निवडणुकीत १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये लाडक्या बहिणींना देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले. मात्र राज्यात सत्ता स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी २१०० रुपये देण्याबाबत काहीच हालचाल नाही. त्यामुळे २१०० रुपये लाडक्या बहिणींना देणार महायुतीची फसवी घोषणा होती, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. त्यातच, लाडक्या बहिणी नाराज आहेत हे फक्त विरोधकच सांगत असतात. लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत. २१०० रुपये देऊ असं कोणी जाहीर केलेलं नाही, असे झिरवाळ प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. झिरवाळ यांच्या वक्तव्यानंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजनेपासून पळ काढतेय, अशी टीका मविआच्या नेत्यांनी केली आहे.
९ महिन्यांचे पैसे जमा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत ९ महिन्यांचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत. एप्रिल महिन्याचे १,५०० रुपये प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन ते तीन दिवसांत जमा होतील, असे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले.