Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह
मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. तिरू नदी व परिसरातील नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी अपघात झाले. या पावसात वाहून गेलेल्या ५ जणांचे मृतदेह सुमारे ४० तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले, अशी माहिती प्रशासनाने शनिवारी दिली.
तिरू नदीत युवक बुडाला
मंगळवारी (दि. १६) सकाळी सुदर्शन केरबा घोनशेट्टी (वय २७) हा शेतातून परतत असताना तिरू नदीच्या प्रवाहात वाहून गेला. सततच्या पावसामुळे नदीला पूर आला होता आणि त्यात तो बुडाल्याचे नंतर स्पष्ट झाले.
रिक्षा प्रवाशांना पुराचा फटका
त्याच दिवशी रात्री ८ च्या सुमारास जळकोट तालुक्यातील मल्हिप्परगा येथे आणखी एक दुर्घटना घडली. पुलावरून जात असताना ऑटोरिक्षा पुराच्या पाण्यात अडकली आणि काही क्षणांतच ती प्रवाहात वाहून गेली. रिक्षामध्ये ५ प्रवासी होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले, तर रिक्षाचालकासह दोघे प्रवासी बेपत्ता झाले.
एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. यामध्ये रिक्षाचालक संग्राम सोनकांबळे, प्रवासी विठ्ठल गवळे आणि तिरू नदीत बुडालेला युवक सुदर्शन घोनशेट्टी यांचे मृतदेह ४० तासांच्या शोधानंतर गुरुवारी सापडले. त्यानंतर उदगीर येथील वैभव पुंडलिक गायकवाड (वय २४) आणि संगीता मुरहरी सूर्यवंशी (वय ३२) यांचे मृतदेह डोंगरगाव तलावातून शोधून काढण्यात आले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), स्थानिक अग्निशमन दल आणि पोलीस पथकांनी दिवस - रात्र शोधमोहीम राबवली. मुसळधार पावसामुळे नदी-नाले वाहत होते, त्यामुळे ही मोहिम अधिक कठीण झाली होती.
जिल्ह्यात मोठे नुकसान
गेल्या दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात ४८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचे अचूक मूल्यांकन झाल्यानंतरच अंतिम आकडा निश्चित होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.