लातूर, हिंगोलीत घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाची सदनिका व भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर

छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणीतील नागरिकांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार
लातूर, हिंगोलीत घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाची सदनिका व भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर

मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारितील छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आल्याने छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणीतील नागरिकांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा "गो लाईव्ह" कार्यक्रमाचा शुभारंभ २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली या नूतन संगणकीय प्रणाली व ॲॅपच्या सहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस २८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजेपासून सुरुवात होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, अर्ज भरणा, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत.

छत्रपती संभाजीनगर मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीची लिंक २७ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. २७ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करता येणार आहे.

१२ एप्रिलला अंतिम यादी जाहीर होणार!

१२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीचे स्थळ व दिनांक मंडळातर्फे नंतर कळविण्यात येणार आहे.

आवास योजनेंतर्गत २३३ सदनिकांचा समावेश!

मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २३३ सदनिकांचा समावेश आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत एकूण २९८ सदनिका व ५२ भूखंड उपलब्ध असणार आहेत. तसेच छ. संभाजी नगर मंडळाच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत ४१० सदनिका व ३०९ भूखंडांचा समावेश आहे.

सल्लागार, एंजट नाही!

नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ/दलाल/मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही, असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in