

लातूर : लातूर-औसा मार्गावरील पेठ परिसरात सोमवारी (दि. २७) दुपारी धावत्या एसटी बसमधील एका माथेफिरू प्रवाशाने अचानक चालकाचे स्टेअरिंग खेचल्याने भीषण अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन आदळली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर पुन्हा नियंत्रण मिळवून ती मोकळ्या जागेत थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पेठ परिसरात घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा आगाराची एसटी बस लातूरहून औसाकडे जात होती. पेठ परिसरातील किड्स शाळेजवळ बस पोहोचताच चालकाच्या पाठीमागे बसलेल्या एका प्रवाशाने अचानक पुढे येत स्टेअरिंग जोरात खेचल्याचा आरोप आहे. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली.
'मला मरायचं आहे' असे म्हणत केले कृत्य
लातूर आगाराचे व्यवस्थापक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवाशाने चालकाच्या केबिनमध्ये प्रवेश करून, "मला मरायचं आहे" असे म्हणत स्टेअरिंग जोराने खेचले. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
दोन स्कूलबसना धडक दिल्यानंतरही चालकाने प्रसंगावधान दाखवत बसवर पुन्हा नियंत्रण मिळवले. त्यानंतर बस काही अंतर पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबवण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
चालक गंभीर जखमी, प्रवाशांवर उपचार
या अपघातात एसटी चालक महादेव देवराव देवगुंडे (५०) यांच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर लातूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अपघातानंतर चालक संबंधित प्रवाशाला जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रक्तबंबाळ अवस्थेतील चालक त्या व्यक्तीची कॉलर पकडून जाब विचारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्यावेळी संबंधित व्यक्ती, "मला तीन दिवसांपासून मारायची ऑर्डर आली होती... पाच जणांना मारायचं होतं, माझा मोबाईल चेक करा, व्हॉट्सॲप बघा" असे बरळताना ऐकू येत आहे. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि इतर प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांकडून तपास सुरू
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले असून, स्टेअरिंग खेचण्यामागील नेमका हेतू आणि अपघाताची कारणे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.