समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस

विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे, तेढ निर्माण करणारे भीतीदायक फोटो प्रसारित करणे, धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे, लोकांच्या भावना दुःखावतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मीडिया सेलने हुडकून काढणे सुरू केले आहे. या सेलच्या वतीने ४ जणांना नोटीस बजावली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे, तेढ निर्माण करणारे भीतीदायक फोटो प्रसारित करणे, धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे, लोकांच्या भावना दुःखावतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे. उमेदवारांना त्यांचे सर्व फेसबुक अकाऊंट जमा करावे लागणार आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाऊंटवरून जाहिरात करताना त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच या निर्धारित सोशल मीडिया अकाऊंटवरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये. त्यामुळे उमेदवारांनी देखील आपले सोशल अकाऊंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे.

१३ जणांचा शोध सुरू

जिल्ह्यातील आणखी १३ जणांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या १३ जणांच्या आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या आहेत. त्यांचे पत्ते व त्यांच्याबद्दलची माहिती तपासणी सुरू आहे. सोशल माध्यमांचा वापर करणाऱ्या तरुणांनी या संदर्भात अधिक जागरूक असावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in