सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

वयाची ८५ वर्षे गाठत असलेले शरद पवार आणि साठी पार केलेले अजितदादा पवार या काका-पुतण्यांतील राजकीय युध्दाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

- राजा माने

लढवेधी लढती

वयाची ८५ वर्षे गाठत असलेले शरद पवार आणि साठी पार केलेले अजितदादा पवार या काका-पुतण्यांतील राजकीय युध्दाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी अशीच लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चालला असल्याचे दाखविले जाते. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मात्र काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार असेच थेट आणि स्पष्ट चित्र उभे राहिले आहे.या लढतीला देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक पदर आहेत. बोटावर मोजण्या एवढ्या खासदार संख्येच्या बळावर शरद पवार यांनी केंद्र आणि महाराष्ट्राच्या सत्तेत सातत्याने मोठा वाटा दहा वर्षांपूर्वी मिळविला होता.२०१४साली देशात नरेंद्र मोदी पर्व सुरु झाले आणि शरद पवारांची राजकीय मांडणी विस्कटली! वाढते वय आणि शारीरिक क्षमता ही आघाडी नैसर्गिकरित्या कमकुवत झाल्याने आज पवारांचे राष्ट्रीय राजकारणातील उपद्रव मूल्य घटले हे वास्तव आहे. तरीही जबरदस्त इच्छाशक्ती आणि राजकीय चातुर्याने ते महाराष्ट्राचे राजकारण करीत राहिले. पण पुढील १०-२० वर्षांनंतर शरद पवार निष्ठावंतांचे राजकीय भविष्य काय असेल? या प्रश्नानेच वर्तमान राजकारणाचा चेहरा बदलविला! नेमका तसाच प्रश्न बारामतीच्या भविष्यातील अस्तित्त्व आणि विकासाच्या अनुषंगाने उपस्थित केला जात आहे.त्याच प्रश्नाचे उत्तर बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मिळणार आहे.त्याच प्रश्नाभोवती या मतदारसंघाचे राजकारण फिरत आहे.शरद पवारांचे पारंपरिक विरोधक अनंतराव थोपटे, स्व. शंकरराव बाजीराव पाटील, संभाजीराव काकडे ही राजकीय घराणी महाराष्ट्राला माहीत आहेत. त्या घराण्यातील नव्या पिढ्यांच्या भूमिका निवडणुकीतील रंगत वाढवत आहेत. पवारांचे कुणालाच अंदाज न येवू देणारे राजकारण विरुद्ध रोखठोक आणि शब्दांच्या विश्वासावर चालणारे अजितदादांचे राजकारण असाही एक पदर या निवडणुकीला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील बारामतीच्या अस्तित्वाची लढाई म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात म्हणजेच नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. या निमित्ताने पवार काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असून, काका शरद पवार जुन्या जाणत्या नेत्यांची मोट बांधतानाच नव्या पिढीच्या लोकांना सोबत घेऊन रणनिती आखत आहेत, तर अजित पवार आपल्या निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महायुतीच्या बळावर जोर लावत आहेत. त्यामुळे यावेळी प्रथमच चुरस पाहायला मिळत आहे.

खा. सुप्रिया सुळे या नेहमी अजित पवार यांच्या मदतीनेच तीनवेळा संसदेत पोचल्या आहेत, असा दावा केला जातो. परंतु खा. सुळे यांचे वैयक्तिक नेटवर्क आणि शरद पवार यांना मानणारा वर्ग आणि मित्रपक्षांचे आमदार यांच्या मदतीने मागच्या तीन

पंचवार्षिकमध्ये यश मिळविले. आता अजित पवार महायुतीसोबत गेल्याने त्यांच्यासमोर आव्हान असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी थेट आपल्या पत्नीला मैदानात उतरविले. त्यामुळे नणंद-भावजय यांच्यात ही लढत होऊ घातली आहे. सध्या निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी चांगल्याच झडत आहेत.आता या भावकीच्या लढाईत कोण बाजी मारते, हे पाहावे लागणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कूल यांच्यात लढत झाली. त्यावेळी सुळेंना ६ लाख ८६ हजार ७१४ मते मिळाली तर भाजपच्या कांचन कूल यांना १ लाख ५५ हजारांहून अधिकच्या मतांनी पराभूत झाल्या. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मागच्या निवडणुकीत अजित पवार यांची साथ मिळाली होती. त्यांनी मतदारसंघातील अनेक नेत्यांची साथ मिळवित नेहमीच विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे प्रत्येकवेळा सुप्रिया सुळे निश्चिंत राहिल्या. आता यावेळी घरातूनच आव्हान मिळाले असून, बाहेर पडलेला राष्ट्रवादीचा गट विरोधात गेल्याने सक्षम विरोधकांसह अजित पवार यांच्याशीच दोन हात करण्याची वेळ त्यांच्यावर आली. पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे. हे दोन मतदारसंघ वगळता चार विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे आहेत. त्यातच माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, राहुल कुल, रमेश थोरात यांच्यासह अजित पवार गटाचे समर्थक अजित पवार गटासोबत असणार आहेत. त्यामुळे खा. सुळे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

बारामतीमध्ये हे सहा विधानसभा मतदारसंघ

बारामती लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये दौंड, खडकवासला, भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामती यांचा समावेश आहे. यात दौंड आणि खडकवासल्यात भाजपचे आमदार आहेत. भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेसचे तर इंदापूर आणि बारामतीत अजित पवार गटाचे आमदार आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मते

२०१९ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी कांचन कुल यांच्या विरोधात बारामतीत सर्वाधिक १ लाख २७ हजार मतांची लिड मिळाली होती. कांचन कुल यांना ४७ हजार ६८ मते मिळाली तर सुळेंनी १ लाख ७४ हजार ९८६ मते मिळाली. पुरंदरमध्ये सुळे यांना केवळ ९ हजार ६०० मतांची लिड मिळाली. दौंड हा राहुल कुल यांचा मतदारसंघ असल्याने तेथे कांचन कुल ७०५३ मतांनी आघाडीवर राहिल्या.

येथे कुल यांना ९१ हजार १७१ मते मिळाली तर सुळेंना ८४ हजार ११८ मते मिळाली. तसेच खडकवासलामध्येही भाजपला ६५ हजारांचे लिड मिळाले. येथे कुल यांना १ लाख ५२ हजार ४८७ तर सुळेंना ८६ हजार ९९३ मते मिळाली. भोरमध्ये सुळे यांना १९ हजारांचे लिड मिळाले. कांचन कुल यांना ९० हजार १५९, तर सुळेंना १ लाख ९ हजार १६३ मते मिळाली. इंदापुरातही सुळेंना ७० हजारांचे लिड मिळाले. येथे कांचन कुल यांना ५२ हजार ६३५ तर सुळेंना १ लाख २३ हजार ५७३ मते मिळाली.

बारामती, इंदापुरातून सर्वाधिक लिड

मागच्या निवडणुकीत बारामती, इंदापूर विधानसभा मतदारसंघांनी सुप्रिया सुळे यांना मोठे लिड दिले. त्यामुळे त्या विजयी होऊ शकल्या. त्या खडकवासल्यात ६५ हजारांनी पिछाडीवर होते. तसेच दौंडमध्येही सुप्रिया सुळेंची लिड तुटली होती तर पुरंदर, भोर विधानसभा मतदारसंघात काठावर लिड मिळाली होती.

मतदारसंघातील आकडेवारीची गणिते या निवडणुकीच्या संदर्भाने सुनेत्रा पवार यांच्या बाजूने झुकताना दिसतात.प्रत्यक्षात काय घडेल, हे ४ जून रोजी मतमोजणीत स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in