

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असताना केंद्र सरकारने घरगुती LPG ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सर्व घरगुती LPG ग्राहकांनी अनिवार्य e-KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे सांगितले आहे. अनेक शहरांमध्ये LPG सिलिंडरच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडियावरील अधिकृत पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाद्वारे (e-KYC) ओळख पडताळणी करणे सर्व LPG ग्राहकांसाठी आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून अतिशय सोपी आहे. ग्राहक घरबसल्या स्मार्टफोनच्या मदतीने काही मिनिटांत e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
१) सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२) तेथून संबंधित तेल कंपनीचे मोबाईल ॲप डाउनलोड करा (Indane, भारत गॅस किंवा HP गॅस).
३) त्यानंतर Aadhaar FaceRD ॲप डाउनलोड करा.
४) तेल कंपनीच्या ॲपमध्ये दिलेल्या सूचनांनुसार FaceRD ॲपद्वारे चेहरा स्कॅन करून e-KYC प्रक्रिया पूर्ण करा.
मंत्रालयाने नागरिकांसाठी e-KYC प्रक्रिया सुरू करण्यासाठी X पोस्टमध्ये स्वतंत्र लिंकही उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना ही प्रक्रिया मोफत आणि काही मिनिटांत पूर्ण करता येते. त्यामुळे इंडेन, भारत गॅस किंवा HP गॅसच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.