

राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवार (दि.८) पासून नागपूरात सुरू झाले आहे. अशातच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी (दि.९) एक व्हिडीओ शेयर केला. मंत्री संजय शिरसाट यांच्या पैशांनी भरलेल्या बॅगच्या व्हिडिओनंतर दानवेंचा हा व्हिडीओ लक्षवेधी ठरतोय. या व्हिडीओवरून शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. "तटकरेंच्या रूपाने आम्ही घरातच शत्रू पाळला आहे." असे वक्तव्य करत त्यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला.
अंबादास दानवे यांनी तीन व्हिडिओ शेयर केले आहेत. त्या व्हिडिओंमध्ये पैशांच्या बंडलसह एक व्यक्ती दिसतेय. ती व्यक्ती आमदार असल्याचा आरोप दानवेंनी केला आहे. या प्रकरणावर आमदार महेंद्र थोरवे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
सुनील तटकरे यांचे कुटीलनीतीचे राजकारण
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, "सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अंबादास दानवेंना पाठवला असावा. रायगड येथील सुनील तटकरे यांचे कुटीलनीतीचे राजकारण पाहता कदाचित त्यांनीच हा व्हिडीओ अंबादास दानवे यांना पाठवला असू शकतो," असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला.
आम्ही घरातच शत्रू पाळला...
ते पुढे म्हणाले, "आम्ही घरातच शत्रू पाळून ठेवला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रूपाने आम्ही घरातच शत्रू पाळला आहे."
नेमकं प्रकरण काय?
"या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल अंबादास दानवेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला.
अंबादास दानवे यांनी या ट्विटमध्ये कोणत्याही आमदाराचं नाव घेतलं नाही. पण हा व्हिडिओ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा असल्याची चर्चा सुरू होती. म्हणूनच, आमदार महेंद्र दळवी यांनी यावर उत्तर दिले.
...तर आमदारकीचा राजीनामा देईन!
ते म्हणाले, "अंबादास दानवे यांनी पुरावे घेऊन हा व्हिडीओ माझाच आहे, हे सिद्ध करुन दाखवावे. मी व्हिडीओत असेल तर आमदारकीचा राजीनामा देईन. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे हा ब्लॅकमेल करणारा आणि सुपारीबाज नेता आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी ओढावलेल्या या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, सुनील तटकरे हे महेंद्र थोरवेंना काही उत्तर देतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.